नाशिक : शेतकऱ्याच्या कष्टाला ‘गोड फळ’ सीताफळ फळबागेतून लाखोंचे उत्पन्न | पुढारी

नाशिक : शेतकऱ्याच्या कष्टाला 'गोड फळ' सीताफळ फळबागेतून लाखोंचे उत्पन्न

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील मौजै खिर्डीसाठे येथील योगेश इप्पर या तरूण शेतकऱ्याने सीताफळाच्या लागवडीतून तब्बल तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत यंदाच्या अतिवृष्टीसारख्या कठीण काळात जिद्दीने नैसर्गिक संकटावर मात केला आहे.

अवघ्या बारावीपर्यंत शिकलेल्या योगेश यांनी शेती हेच करियर निश्चित करत आधुनिक पध्दतीने शेती करायला सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागातील कृषी सहाय्यक हरिभाऊ खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली ०.७० गुंठ्यावरती गोल्डन सीताफळाची लागवड केली. सिताफळांच्या झाडांची संख्या ६०० असुन त्यामध्ये त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. त्याचे योग्य ग्रेडींग आणि पॅकिंग करत सदर माल बांगलादेशला निर्यात केला.

कृषी विभागाच्या मदतीने त्यांना ठिबक सिंचन योजनेचे अनुदान प्राप्त झाले. त्यातून सीताफळ लागवड ही घन लागवड पद्धत केली. त्यामध्ये आतापर्यंत सीताफळाचा उत्पन्न व खर्च यांचा लेखाजोखा काढला तर त्यांना पंचवीस हजार खर्च आला आणि त्यांना वार्षिक तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. इतर पिक करण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च व मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचबरोबर वेळेवर मजुर मिळत नाहीत. परंतु इप्पर हे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून फळबाग लागवड केल्याने त्यांना या समस्या जाणवल्या नाहीत. फळबागेतून नियमित उत्पन्नाचा स्त्रोत त्यांनी तयार केला आहे.

जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत त्यांनी शेतामध्ये मृदा संधारणची देखील खूप कामे केली आहेत. ते गांडूळ खत, कंपोस्ट खत व हिरवळीचे खत १०० टक्के वापरतात. या फळबागेच्या देखभालीत त्यांना पत्नी सौ. मालती यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच भविष्यात ते सिताफळ लागवड क्षेत्रामध्ये वाढ करणार आहेत. प्रधानमंत्री सुक्ष्म व अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत कृषी विभागाचे सहकार्य घेऊन सिताफळापासून पल्प तयार करणे हा नवीन उद्योगाची सुरुवात करणार आहेत.

इतर पिक घेताना अनेक संकटे शेतकऱ्यांना येतात व कधीकधी खर्चसुध्दा वसुल होत नाही. मी पीक पध्दतीत बदल करुन कृषी विभागाच्या मदतीने ठिबक सिंचनाचा वापर करून सिताफळ फळबागेतुन चांगले उत्पादन मिळविले आहे. आणखी सिताफळ लागवड क्षेत्र फळबागांची लागवड करणार आहे.

-योगेश इप्पर, फळबाग शेतकरी, खिरडीसाठे.

हेही वाचा :

Back to top button