फिटनेस अलर्ट : थंडीचा वाढतोय जोर; तरुणाईचा ‘जिम’वर भर | पुढारी

फिटनेस अलर्ट : थंडीचा वाढतोय जोर; तरुणाईचा 'जिम'वर भर

प्रासंगिक : नाशिक : सतीश डोंगरे

ऋतू बदलाबरोबर अनेक आजार डोकं वर काढत असल्याने, व्यायाम हा रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरतो. विशेषत: हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबर वजन घटविण्याची मोठी संधी असल्याने, या काळात व्यायाम करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सध्या जिमबरोबरच व्यायामशाळा, योगा सेंटरमध्ये तरुणांसह ज्येष्ठांचीही मोठी गर्दी होताना दिसत आहे. विशेषत: फिटनेस राखण्यासाठी तरुण जिममध्ये चांगलाच घाम गाळत आहेत.

नाशिकच्या थंडीचा अनुभव काही औरच आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अजून म्हणावी तशी थंडी सुरू झालेली नाही. पावसाळा उशिरापर्यंत लांबल्याने त्याचा परिणाम हिवाळ्यावर झाला आहे. मात्र, सध्या बऱ्यापैकी थंड वातावरण असल्याने फिटनेसकडे नाशिककरांचा कल वाढताना दिसत आहे. हिवाळ्यात ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांची लागण होत असल्याने, रोगप्रतिकारकशक्ती मजबूत ठेवणे गरजेचे असते. याशिवाय या काळात हाडांच्यादेखील बऱ्याच समस्या वाढतात. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यायाम सर्वोत्तम पर्याय ठरतो. दरम्यान, जिममध्ये वाढत असलेल्या गर्दीमुळे जिमचालकांनाही अच्छे दिन आल्याचे चित्र आहे. कोरोना काळात तब्बल दोन वर्षे जिम बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याचा मोठा फटका जिम चालकांना बसला. आता निर्बंध शिथिल झाल्याने पुन्हा एकदा जिम जोमाने सुरू झाल्या आहेत. त्याव्यतिरिक्त योगा सेंटरकडेही नाशिककरांचा कल वाढत आहे. कोरोना काळात योगाचे फायदे बऱ्यापैकी अधोरेखित झाल्याने नागरिकांमध्ये योगाबाबत चांगलीच जनजागृती झाल्याचे दिसून येत आहे.

मॉर्निंग वॉकला गर्दी…

दिवसभर प्रसन्न वाटावे याकरिता मॉर्निंग वॉक उपयुक्त ठरत असते. त्यामुळे सध्या लहानांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत मॉर्निंग वॉकसाठी गर्दी होताना दिसत आहे. मॉर्निंग वॉकमध्ये अनेक आजारांशी दोन हात करण्यास मदत होते. याशिवाय कर्करोग, कार्डियोवैस्कुलच्या रुग्णांनाही याचा आराम मिळतो. वयोवृद्ध मंडळींनी नियमित मॉर्निंग वॉक केल्याने दीर्घायुष्याबरोबरच अनेक आजारांपासून मुक्तता मिळते.

हेही वाचा:

Back to top button