नाशिक : जुलूस-ए-गौसियासाठी आज शहर सज्ज | पुढारी

नाशिक : जुलूस-ए-गौसियासाठी आज शहर सज्ज

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ग्यारहवीं शरीफनिमित्त जुलूस-ए-गौसियाची मिरवणूक सोमवारी (दि.७) नाशिकमधील ज्येष्ठ धर्मगुरू तथा खतीब-ए-शहर हिसामुद्दीन अशरफी व स्थानिक उलेमांच्या नेतृत्वात निघणार आहे. यासाठी सजावटीचे काम पूर्ण झाले असून, शहर परिसर सज्ज झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर होत असलेल्या या उत्सवास मुस्लिम बांधवांची उत्सुकता वाढली आहे. या अनुषंगाने मिरवणूक पूर्णतः डीजेमुक्त असावी. शिवाय डोक्यावर इस्लामी टोपी परिधान करून, विशेष करून वेळेचे भान ठेवत मिरवणुकीत सामील व्हावे व अनावश्यक अंतर न ठेवता वेळीच गंतव्यस्थान गाठावे, असे आवाहन अशरफी यांनी केले आहे.

इस्लाम धर्मातील ज्येष्ठ धर्मगुरू हजरत गौसे-ए-आजम दस्तगीर यांची ग्यारहवीं शरीफनिमित्त रविवारी सायंकाळपासून ग्यारहवीं तारीख सुरु होताच मशिदी, दर्गा व घरांमध्ये पवित्र कुराण पठण, फातेहा पठणासह गौसे आझम यांच्या स्मरणार्थ विविध धार्मिक कार्यक्रमांची सुरवात झाली आहे. बागवानपुरा परिसरातील हरी नगरीमधील मदरसा रझा-ए-मुस्तफा येथे कादरी चिश्ती फाउंडेशनतर्फे जश्न-ए-गौसुलवरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मौलाना गुफरान अली कादरी यांनी हजरत गौसे-ए-आजम दस्तगीर यांच्या व्यक्तिमत्वावर उजाळा देत भाविकांना उपदेश केले. यावेळी मोहम्मद आसिफोद्दीन जीलानी सरकार व सय्यद मोहम्मद अल्ताफअली अल्विऊल हुसैनी व्यासपीठावर उपस्थित होते. 

मिरवणूक मार्ग असा …. जुने नाशिकमध्ये दुपारी ३ वाजता जुलूस-ए-गौसियाची मिरवणूक जहांगीर मशीद चौक मंडई येथून सुरुवात होऊन बागवानपुरा, दुधाधारी मशिद कथडा, शिवाजी चौक, मीरा दातार, भोई गल्ली, आझाद चौक, पठाणपुरा, नाईकवाडीपुरा, बुधवार पेठ, आदम शाह दर्गा, काजीपुरा, बुरुड गल्ली, कोकणीपुरा, महात्मा फुले मार्केट, खडकाळी, शाहिद अब्दुल हमीद चौक, दूध बाजार, पिंजार घाट मार्गे बडी दर्गाह शरीफच्या प्रांगणात सांगता होणार आहे.

हेही वाचा:

Back to top button