पुणे : पत्नीचा शारीरिक छळ करून दिला तलाक; चार जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : पत्नीचा शारीरिक छळ करून दिला तलाक; चार जणांवर गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीचा शारीरिक छळ करून तिला सिगारेटचे चटके देऊन पतीने तीन वेळा तलाक म्हणत घरात कोंडून ठेवत खुनाचा प्रयत्न केल्याची घटना 21 ऑक्टोबरला लोहगावमध्ये घडली आहे. याप्रकरणी फारूख शेख (वय 31), नूरजहाँ शेख, शब्बीर शेख, आयेशा शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी महिलेचे आणि फारूखचे नोव्हेंबर 2021 मध्ये लग्न झाले आहे.

लग्न झाल्यापासून त्यांच्या मनासारखे वागले नाही म्हणून फिर्यादीच्या पतीचे दुसरे लग्न लावून देऊ अशी भीती तिच्या सासरच्यांनी फिर्यादीला घातली. तसेच आई-वडिलांकडून 5 लाख आणावेत म्हणून तिचा छळ केला. संशयित आरोपी एवढ्यावरही थांबले नाहीत, 10 ऑक्टोबर रोजी फिर्यादीचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न केला. पतीने 21 ऑक्टोबर रोजी तिच्याशी भांडणे काढून तिला बेदम मारहाण केली.

तसेच तिच्या गालावर सिगारेटचे चटके देत तोंडावर उशी दाबून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला तीन वेळा तोंडी तलाक देत घरात कोंडून ठेवले. या सर्वांतून तिने सुटका करून घेत माहेर गाठले. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेत पतीसह सासरच्यांविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक शिळमकर तपास करीत आहेत.

Back to top button