नाशिकमध्ये राजर्षी शाहू महाराजांवर चित्रप्रदर्शन | पुढारी

नाशिकमध्ये राजर्षी शाहू महाराजांवर चित्रप्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथे प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने रविवारी (दि. 6) नाशिक जिल्हा साहित्यिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील लता कांबळे, करुणा वाडेकर, मनीषा कापुरे, अर्चना झोटिंग या महिला राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रप्रदर्शनाचे आयोजन करणार आहेत.

शाहू महाराज यांनी देशाला सामाजिक न्यायाची शिकवण दिली. त्याचबरोबर आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाचे तत्त्व राज्यघटनेच्या आधी लागू केले. शाहू महाराजांचा सामाजिक समतेचा विचार आणि वारसा चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे नेणे आणि त्यातून समाज जागृती, समाज प्रबोधनाचे कार्य करणे, हा या चित्रप्रदर्शनाचा उद्देश आहे. या स्मृती शताब्दीनिमित्त महिला सक्षमीकरण, सामाजिक सद्भाव आणि संविधान मूल्यांप्रति सामान्याची कटिबद्धता वाढीस लागण्याच्या दृष्टीने मूलगामी संदेश देणे, असे या चित्रांचे स्वरूप आहे. माणगाव परिषदेला 100 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत येथे खास व्याख्यानही होणार आहे. या मेळाव्याप्रसंगी उपस्थित राहणारे ज्येष्ठ साहित्यिक तथा पँथरचे नेते अर्जुन डांगळे, कामगारनेते भालचंद्र कानगो, समीक्षक जी. के. ऐनापुरे, अभ्यासक सचिन गरुड या मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. नाशिककरांनी मोठ्या संख्येने या जिल्हा मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अहिरे आणि सचिव प्रल्हाद पवार यांनी केले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button