नाशिक : निओ मेट्रोला केंद्राकडून लवकरच हिरवा कंदील | पुढारी

नाशिक : निओ मेट्रोला केंद्राकडून लवकरच हिरवा कंदील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहर दत्तक घेतलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘निओ मेट्रो’ला येत्या दोन महिन्यांत केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात येणार असून, गेल्या दीड वर्षापासून हा प्रकल्प मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रलंबित होता. याबाबत मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पालकमंत्र्यांनी बोलविलेल्या आढावा बैठकीत माहिती दिली.

दरम्यान, मनपाने केंद्र शासनाकडे इलेक्ट्रिक बसेससाठी प्रस्ताव सादर केला आहे. तसेच अमृत-2 योजनेंतर्गत 350 कोटींचा पाणीपुरवठा आराखडा आणि 400 कोटींच्या मलनिस्सारण आराखड्यासाठी निधीची प्रतीक्षा असल्याचे आयुक्तांनी पालकमंत्री दादा भुसे यांना सांगितले. नमामि गोदा प्रकल्पाच्या सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले. गुरुवारी (दि.3) झालेल्या आढावा बैठकीस खासदार हेमंत गोडसे, भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, अ‍ॅड. राहुल ढिकले उपस्थित होते. बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला. नियुक्त समितीमार्फत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती ना. भुसेंनी घेतली. निओ मेट्रो प्रकल्प केंद्र शासनाकडे मंजुरीच्या टप्प्यात आहे. येत्या दोन महिन्यांत मंत्रिमंडळाची मंजुरी मिळून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. बैठकीत सिंहस्थाच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला. सिंहस्थासाठी भूसंपादनाचा मुद्दा उपस्थित झाला असता कुंभमेळा तसेच सर्वोच्च, उच्च व जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महापालिकेला जवळपास पाच हजार कोटींची गरज असल्याचे मनपा प्रशासनाने बैठकीत निदर्शनास आणून दिले. महापालिका सध्या आर्थिक संकटातून जात असल्याने विकासकामांसाठी केवळ 30 कोटीच असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

घरपट्टीकडे काणाडोळा…
भाजपच्या सत्ताकाळात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रहिवासी तसेच व्यावसायिक घरपट्टीत अवाच्या सव्वा दराने वाढ करून सर्वांनाच शॉक दिला होता. त्यावर आजवर शासनाकडून तसेच मनपाकडूनही आश्वासने देऊनही तोडगा निघाला नाही. यामुळे 2018 नंतरच्या नवीन घरमालकांना कित्येक पटीने घरपट्टी मोजावी लागत आहे. याबाबत पालकमंत्र्यांच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला असता केवळ कमर्शियल आणि औद्योगिक क्षेत्रातीलच घरपट्टी कमी करण्याकडे ओढा दिसून आल्याने रहिवासी घरपट्टीकडे पालकमंत्र्यांनी काणाडोळा केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. व्यावसायिक घरपट्टी कमी करण्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्याची सूचना त्यांनी केली.

पेठ रोडला क्राँकिटीकरण…
मिर्ची हॉटेल येथील अपघातानंतर शहरातील 46 पैकी 23 धोकादायक स्पॉट हटविण्यात आल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून करण्यात आला. यावेळी आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी औरंगाबाद रोडवरील मिर्ची चौक भागात उड्डाणपूल उभारण्याची गरज असल्याचे सांगत त्याचे महत्त्व पटवून दिले. बांधकाम विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आ. ढिकले यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर संयुक्तपणे पाठपुरावा करण्याची सूचना ना. भुसे यांनी केली. पेठ रोडला सहा किमीच्या मार्गाची चाळण झाली असून, मनपा निधी तसेच नियोजन समितीच्या निधीतून डागडुजी व काँक्रिटीकरण करण्याची महत्त्वपूर्ण मागणी आ. ढिकले यांनी केली. आ. सीमा हिरे यांनी पेलिकन पार्कचे उद्घाटन करणे तसेच छत्रपती संभाजी स्टेडियमचे नूतनीकरण करण्याची सूचना केली.

बैठकीत चर्चाच अधिक…
विशेष आढावा बैठक असूनही ठोस निर्णय कमी आणि चर्चाच अधिक झाल्याने बैठकीमुळे अधिकारीही वैतागून गेले होते. जवळपास अडीच ते तीन तास बैठक चालली. त्याचबरोबर बैठकीतील अनेक विकासकामे व प्रकल्पांवर या आधीच निर्णय झाले आहेत. बहुतांश प्रस्ताव हे भाजपच्याच काळात मंजूर झालेले असल्याने त्यावर शिंदे गटाकडून नव्याने दावा करण्याचा प्रयत्न केला जात आहे की काय अशी चर्चा महापालिकेत बैठकीदरम्यान ऐकायवास मिळाली.

हेही वाचा:

Back to top button