नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) भागात बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आल्याने केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दोन वेळा बिबट्या परिसरात फिरत असल्याचे आढळल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असता केंद्राची देखभाल करणाऱ्या ठेकेदाराने महापालिकेला ही बाब सांगितल्यानंतर मनपाने वनविभागाला याबाबत कळविले आहे.
शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने सहा ठिकाणी सिवर झोन उभारून त्याअंतर्गत ११ मलनिस्सारण (एसटीपी) केंद्रे उभारली आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते गोदावरीसह उपनद्यांमध्ये सोडले जाते. पिंपळगाव खांब परिसरात वालदेवी नदीजवळ नव्याने एसटीपी उभारण्यात आले असून, गेल्या दोन वर्षांपासून मलनिस्सारण केंद्र कार्यान्वित आहे. या केंद्राची देखभाल व दुरुस्तीचे काम आनंद कन्स्ट्रूवेल या संस्थेमार्फत केले जात आहे. दिवस आणि रात्रपाळीत ठेकेदाराचे प्रत्येकी सहा कर्मचारी कार्यरत आहेत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कर्मचारी काम करीत असताना या भागात कर्मचाऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने जवळच्याच शेतात धूम ठोकली. मंगळवारी (दि.२५) पुन्हा मलनिस्सारण केंद्राच्या परिसरात बिबट्ये दिसून आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाल्याने त्यांनी ही बाब ठेकेदाराच्या कानावर टाकली. बुधवारी (दि.२) ठेकेदाराने बिबट्याचा वावर असल्याची माहिती मनपाला कळवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यानुसार मनपाच्या यांत्रिकी विभागातील कार्यकारी अभियंता बाजीराव माळी यांनी वनविभागाकडे माहिती कळविली असून, या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.