पिंपरी : पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे हेल्थ रेकॉर्ड | पुढारी

पिंपरी : पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे हेल्थ रेकॉर्ड

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी- चिंचवड महापालिका शाळा स्मार्ट करण्याबरोबरच आता विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम रहावे, यावर भर दिला जाणार आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना काही आरोग्य समस्या असल्यास त्यांना पालिकेच्याच रुग्णालयात उपचार दिले जाणार आहेत. यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागणार नाही.

कोरोना काळात शाळा दोन वर्षे बंद होत्या. तसेच डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळ आणि इतर शारीरिक हालचाल असणार्‍या गोष्टींचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दिसू लागला आहे. विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक व्याधी जडत आहेत. पालिका शाळेतील विद्यार्थी हे सामान्य घरातून आलेले असल्याने पालक शिक्षण आणि आरोग्य याबाबत फारसे जागरूक नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हेळसांड होते. बर्‍याचदा आजाराने गंभीर स्वरूप घेतल्यानंतर आजार लक्षात येतो. अशावेळी विद्यार्थ्यांची वर्षातून दोन वेळा तपासणी झाल्यास आजाराचे लवकर निदान होईल. विद्यार्थ्यास वेळेत उपचार मिळेल.

पूर्वी पालिका शाळांमध्ये वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होत असे. येथून पुढे ही तपासणी दोन वेळा केली जाणार आहे. ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा एकत्रित डाटा आम्हांला मिळेल. हा डाटा सर्व शाळांमध्ये स्मार्ट टिव्ही प्रोग्राममध्ये संकलित केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर मिळेल. तसेच विद्यार्थ्यांच्या पोषक आहारावरदेखील भर दिला जाणार आहे.
– संजय नाईकडे (प्रशासन अधिकारी, पिं.चिं. मनपा)

Back to top button