कोणी विकाऊ नाही.. रवी राणांना आवर घाला ; गुलाबरावांची फडणवीसांकडे मागणी | पुढारी

कोणी विकाऊ नाही.. रवी राणांना आवर घाला ; गुलाबरावांची फडणवीसांकडे मागणी

जळगाव : प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या वाद सुरु आहे. या वादात शिंदे गटाच्या ४० आमदारांना बदनाम करु नका, असे खडेबोल शिंदे गटातले आमदार आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना सुनावले आहेत. रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावे. शिंदे गटातले कोणी विकाऊ नाहीत, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी रवी राणांना आवर घालावी अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

अमरावतीत आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद आता आणखी वाढला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर आरोप करताना गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचं म्हटलं होतं. या वादावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रवी राणा यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखं आहे. कोणी विकावू नाही. पण तुमच्या एका वादामुळे ४० आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. म्हणून रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना फटकारले आहे.

रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाही, तर ही गोष्ट चुकीची होईल आणि लोकांमध्ये सभ्रम निर्माण होईल. ४० वर्षांचं करियर लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रवी राणा यांना आवर घालावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करतो. तसेच दोघांनीही शांत बसवावं, हीच प्रार्थना असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

तर आज ही वेळ आली नसती…

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून कटुता संपवावी अशी साद देवेंद्र फडणवीस यांना घातली आहे. यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यापूर्वीच अशी साद घातली असती तर आज ही वेळ आली नसती. ज्यावेळी फाटाफूट झाली, त्यावेळी आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी ही साद घातली गेली असती, तर आज बासुंदी अन् विष म्हणून कटुता संपवा अशी वेळ आली नसती, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Back to top button