Gujarat Election: गुजरातचा मुख्यमंत्री जनताच ठरवणार: केजरीवाल यांची घोषणा | पुढारी

Gujarat Election: गुजरातचा मुख्यमंत्री जनताच ठरवणार: केजरीवाल यांची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता गुजरात विधानसभा निवडणुकीच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम आदमी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात निवडणुकीची मोठी तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असावा, यासाठी जनतेचे मत आजमावण्यात येणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जनताच ठरवेल, अशी घोषणा सुरतमध्ये आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल  (Gujarat Election) यांनी आज (दि.२९) पत्रकार परिषदेत केली.

यावेळी केजरीवाल (Gujarat Election) म्हणाले की, मला गुजरातच्या जनतेकडून जाणून घ्यायचे आहे की, पुढील मुख्यमंत्री कोण असावा? यासाठी आम्ही एक क्रमांक प्रसिद्ध करणार आहोत. लोकांचे मत जाणून घेण्यासाठी 6357000360 हा क्रमांक प्रसिद्ध करत आहोत. या क्रमांकावर तुम्ही एसएमएस करू शकता किंवा व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवू शकता किंवा व्हॉईस संदेश पाठवू शकता. तुम्ही aapnocm@gmail.com वर ईमेल देखील करू शकता. ३ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लोक आपले मत मांडू शकतात. यानंतर 4 नोव्हेंबरला आम आदमी पार्टी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्‍यात येणार आहे.

आम्ही जनतेला विचारून ठरवतो की, तुम्हाला मुख्यमंत्री म्‍हणून कोण हवे आहे. पंजाबमध्ये आम्ही लोकांना मुख्यमंत्री कोण व्हावे, हे विचारले होते. त्यानुसार लोकांच्या इच्छेनुसार आम्ही भगवंत मान यांना मुख्यमंत्री केले, असे केजरीवाल यांनी सांगितले.
गुजरातमध्ये आम आदमी पार्टी सरकार स्थापन करणार आहे. अशा परिस्थितीत आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जनता ठरवेल, तो गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री असेल. त्यामुळे आज आम्ही जनतेला विचारतो की, तुमचा मुख्यमंत्री कोण असावा ते सांगा, असेही ते म्हणाले. मोफत वीज, उत्तम शिक्षण आणि आरोग्य सुविधा हा आमच्या सरकारचा अजेंडा असेल, असेही त्यांनी स्‍पष्‍ट केले.

दरम्‍यान, निवडणूक आयोगाकडून गुजरात निवडणुकीच्या तारखा १ नोव्हेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुका दोन टप्प्यात होणार असून हिमाचलच्या निवडणुकीप्रमाणे निकालही 8 डिसेंबरला येऊ शकतात. गुजरात निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान २ डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात ४ आणि ५ डिसेंबरला मतदान होऊ शकते.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button