नाशिक : ऋषिकेश शेलार यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध | पुढारी

नाशिक : ऋषिकेश शेलार यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

नाशिक, सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर शहरातील विजयनगर येथील वारकरी भवनात सुमधुर भावगीत व भक्तिगीतांचा सुरेल मैफल रंगलेली बघायला मिळाली. पहाटेच्या मंद वार्‍याची झुळूक आणि कोवळी सोनेरी किरणे अंगावर घेत उपस्थितांनी सुरावटींचा आनंद लुटला. अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला. इंडियन आयडॉल मराठी फेम, सिन्नरचे भूमिपुत्र, सुप्रसिद्ध गायक व संगीतकार ऋषिकेश शेलार यांचे सुमधुर स्वर कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

विशाल चांडोले यांच्या संकल्पनेतून व संयोजनातून दिवाळी पहाट 2022 कार्यक्रमाचे दुसरे वर्ष पार पडले. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते गणेश मूर्तीस  पुष्पहार अर्पण करून व आयोजकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गणेशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

इंडियन आयडॉल मराठी फेम, सिन्नरचे भूमिपुत्र, सुप्रसिद्ध गायक व संगीतकार ऋषिकेश शेलार यांनी सादर केलेल्या विविध सुमधुर गीतांनी उपस्थित मंत्रमुग्ध झाले. त्यांना अभिजित शर्मा, अनिल धुमाळ, सुधीर सोनवणे, सहगायिका अश्विनी जोशी, हार्मोनियम विद्याधर तांबे, तबला वादक प्रमोद निफाडे, पखवाज वादक आकाश बैरागी, निवेदक रवींद्र कांगणे यांची साथ लाभली.

आयोजक अतुल अग्रवाल, पांडुरंग बिन्नर, एम. जी. कुलकर्णी, बबन वाजे, पनाभाई शहा, सोपान परदेशी, अक्षय कानडी, शांताराम दारुंटे, डॉ. प्रशांत शिंदे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमास श्री विठ्ठल मंदिर सेवा समिती वारकरी भवन यांचे सहकार्य लाभले. ओम पन्हाळे, शरद चव्हाणके, अजय बेदडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाई माझ्या गंऽऽऽ दुधात नाही पाणी….
विठ्ठलनामाने सुरुवात होऊन, माझे माहेर पंढरी, बघ उघडून दार देव अंतरंगातला गावल का, देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे, लंबी जुदाई, बाई माझ्या गं दुधात नाही पाणी, एक राधा एक मीरा, शायरी यासह विविध सुमधुर गीत सादर केले. सहगायिका अश्विनी जोशी यांनी विठ्ठलनामाची शाळा भरली, माझी रेणुका माउली ही गीते गायली. हेचि दान देगा तुझा विसर ना व्हावा या गाण्याने सांगता करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button