नाशिक : ‘स्वच्छता मॉनिटर’ ठेवणार गावात कचरा टाकणार्‍यांवर ‘वॉच’ | पुढारी

नाशिक : ‘स्वच्छता मॉनिटर’ ठेवणार गावात कचरा टाकणार्‍यांवर ‘वॉच’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘मिशन स्वच्छ भारत’ या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यात सर्व शाळांमध्ये 2 ऑक्टोबर 2022 पासून लेट्स चेंज ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्प सुरू झालेला आहे. प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर अशी जबाबदारी स्वीकारण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील पाचवी ते आठवीचे विद्यार्थी हे आपल्या गावात निष्काळजीपणे इतरत्र कचरा टाकणार्‍यांना थांबवून त्यांची ती चूक त्यांच्या निदर्शनास आणून देत ‘स्वच्छता मॉनिटर’ म्हणून काम करणार आहेत. उत्तम कामगिरी करणार्‍या स्वच्छता मॉनिटरांचा जिल्हास्तरावरून प्रमाणपत्र देऊन गौरवही होणार आहे.
जिल्ह्यात लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर प्रकल्प दिवाळीच्या सुट्यांमध्ये 10 नोव्हेंबरपर्यंत करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थी केवळ निष्काळजीपणे कचर्‍याची विल्हेवाट लावणार्‍यांना इतरत्र कचरा टाकणार्‍यांना थांबवून त्यांची ती चूक त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. स्वच्छता मॉनिटरगिरी शाळेत किंवा घराजवळच नाही तर सर्वच ठिकाणी करणे अपेक्षित आहे.

विद्यार्थी या अनुभवांचे संक्षिप्त वर्णन स्वतः किंवा पालकांच्या सहाय्याने पालकांच्या सोशल मीडियावर #swachhatamonitor वर शेअर करतील किंवा प्रतिक्रिया संक्षिप्त स्वरूपात आपल्या वर्गशिक्षकांना किंवा शाळा समन्वयक यांना कळवतील. वर्गशिक्षकांनी किंवा शाळा समन्वयक यांनी 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर‘ म्हणून विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेला असा अनुभव संक्षिप्त स्वरूपात स्वच्छता मॉनिटरच्या फोटोसह शाळेच्या अथवा स्वत: च्या इन्स्टाग्राम अथवा फेसबुकवर #swachhtamonitor आणि @swachhtamonitor असे लिहून 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत पोस्ट करतील.

या उपक्रमाद्वारे आपले विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर बनून कळत नकळत होणार्‍या कचर्‍याच्या बाबतीतल्या निष्काळजीपणाची असामाजिक सवय आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शाळेतून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरिंग करण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम यांनी शाळांना केले आहे.

हेही वाचा :

Back to top button