नाशिक : ‘नृत्यानुनाद’ने केले दीपोत्सवाचे स्वागत | पुढारी

नाशिक : ‘नृत्यानुनाद’ने केले दीपोत्सवाचे स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दुतर्फा नक्षीदार सुंदर रांगोळ्या, तेवणार्‍या पणत्या, फुलांनी आणि आकाशकंदिलांनी सुशोभित रंगमंच अशा मंगलमय प्रसन्न वातावरणात शुक्रवारी (दि.21) वसूबारसला पहाटे दीपोत्सवाचे स्वागत करणारा बहारदार नृत्यानुनाद कार्यक्रम उपस्थित रसिकांना भावला.

रचना ट्रस्ट आणि कीर्ती कलामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने नाशिककरांना मनसोक्त आनंद दिला. नवरचना विद्यालयाच्या प्रांगणावर रंगलेल्या या आनंदनुपुरांना रसिकांनी प्रचंड उपस्थितीत दाद दिली आणि चैतन्याने भरलेली ही पहाट उत्तरोत्तर रंगत गेली. गणेश: सर्वदेवांना आदिपुज्यं सदैव ही भूप रागात बांधलेली रवींद्र साठे यांच्या आवाजातील गणेश वंदनेने अदिती पानसे यांनी नृत्यानुनादचा प्रारंभ केला. त्यानंतर त्रितालातील तिहाई तोडे परण, चकदार अशा चढत्या क्रमाने कीर्ती कला मंदिराच्या बालकलाकारांनी रंगमंच खुलवला. जुगलबंदीतून केलेले छोट्या मुलींचे नृत्याविष्कार भाव खाऊन गेले. आधी, बराबर, दुगुणः चौगुण आठ गुण अशा जुगलबंदीतून पेश झालेल्या ततकाराला टाळ्यांच्या कडकडाटाने रसिकांनी दाद दिली. तुलसीदासरचित हनुमान चालीसा आणि श्रीराम वंदनेने वातावरणात प्रसन्न भक्तिभाव निर्माण केला. नृत्य अर्थात छंद. छंद म्हणजे नाद आणि आनंद. या आनंदाच्या शिदोरीचा प्रत्यय झपतालाने दिला. कार्यक्रमाचा समारोप पं. बिरजू महाराज यांनी स्वरबद्ध केलेल्या धमारमधील भैरवी तराण्याने झाला. सहजसुंदर हालचाली संतुलित लयकारी आणि नृत्य पोरांची समर्पक गुंफण यामुळे रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. यानंतर कार्यक्रमातील लहान मोठ्या सगळ्याच नृत्यांगनांनी रेखाताई नाडगौडा यांच्यासोबत केलेल्या पदन्यास सोबत ईश्वरीची सुरेल आलापी, सुजित काळे यांची तबल्यावरील साथ कार्यक्रमाचा परमोच्च आनंद देणारा ठरला. कार्यक्रमाला अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा, डॉ. पल्लवी धर्माधिकारी, कांचन गडकरी, डॉ. शोभा नेर्लीकर, नवरचनाचे मुख्याध्यापक पालखेडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन रेखा नाडगौडा यांनी केले.

हेही वाचा:

Back to top button