T-20 World Cup : पहिल्‍या सामन्‍यात न्‍यूझीलंडचा दिमाखदार विजय, ऑस्‍ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव | पुढारी

T-20 World Cup : पहिल्‍या सामन्‍यात न्‍यूझीलंडचा दिमाखदार विजय, ऑस्‍ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्ट्रेलिया आजपासून प्रारंभ झालेल्‍या टी-20 विश्वचषकाच्या (T-20 World Cup) पहिल्‍याच सामन्‍यात न्‍यूझीलंडने दिमाखदार विजय मिळवला. पारंपरिक शेजारी ऑस्‍ट्रेलियाचा ८९  धावांनी पराभव करत या स्‍पर्धेतील प्रतिस्‍पर्धी संघांना न्‍यूझीलंडने एकप्रकारे इशाराच दिला आहे.

सिडनी स्‍टेडियमवर स्‍पर्धेचा पहिला सामना ऑस्‍ट्रेलिया विरुद्‍ध न्‍यूझीलंड असा रंगला. ऑस्‍ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र कर्णधार अ‍ॅरोन फिंच याचा निर्णय चुकीचा ठरला. कारण न्‍यूझीलंडच्‍या फलंदाजांनी ऑस्‍ट्रेलियाच्‍या गोलंदाजांचा दबाव झुगारत सुरुवातीपासून दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले.

न्‍यूझीलंडचे सलामीवीर फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवे यांनी आक्रमक सुरुवात केली.  पहिल्‍याच षटकामध्‍ये मिचेल स्‍टार्कला फिन ऍलन याने दोन चौकार, एक षटकार लगावला ऑस्‍ट्रेलियाच्‍या वेगवान गोलंदाजांचा दबाव झुगारला. पहिल्‍याच षटकात १४ धावा फटकावल्‍या. दुसर्‍या षटकात हेजलवूडला दोन चौकार ठोकत कॉनवेने आपल्‍यावरील दडपण कमी केले. पॅट कमिन्सच्‍या तिसर्‍या षटकामध्‍ये फिन एलनला जीवनदान मिळाले. अ‍ॅडम झम्पाने त्‍याचा झेल सोडला. यानंतर फिन एलनने सलग दोन चौकार फटकावले.
हेजलवूडने पाचव्‍या षटकाच्‍या पहिल्‍याच चेंडूवर फिन ऍलनला त्रीफळाचीत करत न्‍यूझीलंडला पहिला धक्‍का दिला. एलनने १६ चेंडूत ४२  धावा करत लिफ ऍलन तंबूत परतला. यानंतर डेव्हॉन कॉनवेच्‍या  साथीला कर्णधार केन विल्यमसन आला.  पॉवर प्‍लेमध्‍ये ( पहिली ६ षटके ) न्‍यूझीलंडने एक गडी गमावत ६५ धावा केल्‍या.

डेव्‍हॉन कॉनवे चमकला

ऍलन बाद झाल्‍यानंतर डेव्हॉन कॉनवेच्‍या आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी धावफलक हालता ठेवला. न्‍यूझीलंडने 11 षटकांमध्‍ये 100 धावा पूर्ण केल्‍या. डेव्हॉन कॉनवेने ३६ चेंडूत अर्धशतक फटकावले. फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा याने केन विल्यमसन याला यष्‍टीचीत केले. विल्यमसन 23 धावांवर बाद झाला. १४ षटकानंतर न्‍यूझीलंडने २ गडी गमावत १३४ धावा केल्‍या आहेत. ग्लेन फिलिप्स याने हेजलवूडकडे सोपा झेल दिला. न्‍यूझीलंडने १७ षटकांमध्‍ये तीन गडी गमावत  १६१ धावा केल्‍या. अखेरच्‍या तीन षटकांमध्‍ये जिम्‍स नीशम आणि सलामीवीर डेव्‍हॉन कॉनवेने यांनी न्‍यूझीलंडने २०० धावापर्यंत मजल मारली.  कॉनवेने ५८ चेंडूत नाबाद ९२ धावा केल्‍या.

ऑस्‍ट्रेलियाचा डाव गडगडला

२०१ धावांचा पाढलाग करणार्‍या ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघाला दुसर्‍याच षटकामध्‍ये धक्‍का बसला. डेव्हिड वॉर्नर सहा चेंडूत पाच धावांवर बाद झाला. टिम साऊदीने त्‍याला त्रीफळाचीत केले. यानंतर कर्णधार अ‍ॅरोन फिंच याने  मिचेल सँटनरच्‍या गोलंदाजीवर केन विल्यमसनकडे सोपा झेल दिला.  फिंच याने ११ चेंडूत १३ धाव केल्‍या. यानंतर पाचव्‍या षटकामध्‍ये सँटनरच्‍याच गोलंदाजीवर मिचेल मार्शचा झेल जिम्‍स नीशम घेतला. मिचेल सँटनर याच्‍या गोलंदाजीवर मार्कस स्टोईनिस उत्तुंग फटका लगावला. यावेळी ग्लेन फिलिप्स याने झेपावत
स्‍टोईनिसचा झेल फकडला. ग्‍लेन याने केलेली फिल्डींग हा या सामन्‍यातील सर्वोच्‍च क्षण ठरला.

११ व्‍या षटकामध्‍ये सँटनरच्‍या गोलंदाजीवर नीशमने झेल घेत टीम डेव्‍हीडला तंबूत धाडले. १३ व्‍या षटकामध्‍ये मॅथ्यू वेड हा अवघ्‍या चार चेंडूत दोन धावा करुन बाद झाला. १३ षटकांनंतर ऑस्‍ट्रेलियाने ६ गडी गमावत ८७ धावा केल्‍या आहेत. १४ व्‍या षटकामध्‍ये इश सोधीने ग्लेन मॅक्सवेलला त्रीफळाचीत करत ऑस्‍ट्रेलियाला सातवा धक्‍का दिला. २८ धावांवर खेळणार्‍या ग्लेन मॅक्सवेल याला इश सोधीने त्रीफळाचीत केले. यानंतर मिचेल स्टार्क याला ट्रेंट बोल्ट याला चार धावांवर तर अ‍ॅडम झम्पाला शून्‍यवर तंबूत धाडले. यानंतर पॅट कमिन्स याने १८ चेंडूत २ चौकार आणि एक षटकार फटकावत २१ धावांची खेळी केली. कमिन्‍सला साऊदीच्‍या गोलंदाजीवर यष्‍टीरक्षक डेव्हॉन कॉनवे याने झेलबाद केले.

तब्‍बल ११ वर्षांनी न्‍यूझीलंडने केला पराक्रम

गेल्या वर्षी टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात ऑस्‍ट्रेलिया आणि न्यूझीलंड आमने-सामने आले होते. न्‍यूझीलंडच्‍या संघाने 2011 पासून म्‍हणजे गेली ११ वर्ष ऑस्ट्रेलियाच्‍या संघाला ऑस्ट्रेलियाला हरवलेले नव्‍हते. आजचा सामना जिंकत न्यूझीलंडला आपल्या 2021 विश्‍वचषक अंतिम सामन्‍यातील पराभवाची परतफेड केली. तसच तब्‍बल ११ वर्षांनी ऑस्‍ट्रेलियाचा त्‍यांच्‍याच मायदेशात पराभव केला.

न्‍यूझीलंड  संघ : डेव्हॉन कॉनवे ( यष्‍टीरक्षक ), फिन ऍलन, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जिम्‍स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, इश सोधी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट.

ऑस्ट्रेलिया संघ : अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोईनिस, टीम डेव्‍हिड, मॅथ्यू वेड( यष्‍टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झम्पा, जोश हेजलवूड,

 

Back to top button