जळगाव : निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला | पुढारी

जळगाव : निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांना हायकोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व फेटाळल्यानंतर हायकोर्टातही त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर औरंगाबाद न्यायालयाने बकालेचा शुक्रवारी, दि.21 अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर औरंगाबाद हायकोर्टात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. परंतू तेथे देखील शुक्रवारी, दि.21 अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. या वृत्ताला हस्तक्षेप याचिकाकर्ते प्रशांत इंगळे यांनी दुजोरा दिला आहे. तसेच फिर्यादी विनोद देशमुख यांनी देखील याबाबतची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल केली आहे.
बकाले अजूनही बेपत्ताच…
या प्रकरणाचा तपास जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडून काढून, तो होम डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांनी बकाले यांच्या शोधार्थ तीन पथकांची नेमणूक केली. त्यातील दोन पथके नुकतेच रीकाम्या हाती परतले आहेत.

हेही वाचा:

Back to top button