सोमवारी, दि.17 रोजी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेच्या सदस्यांनी बंडखोरी करीत नंदुरबार जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्या हाती असलेली सत्ता संपुष्टात आणली. भारतीय जनता पार्टीला साथ देत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या डॉक्टर सुप्रिया गावित यांना तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे सुहास नाईक यांना बहुमताने निवडून दिले. त्यामुळे गुरुवारी, दि. 20 रोजी झालेल्या सभापती पदाच्या निवडीप्रसंगी बहुमतात असलेल्या भाजपा, उद्धवसेना व काँग्रेसचा बंडखोर गट यांचे उमेदवार बिनविरोध निवडून येतील हे आधीच स्पष्ट दिसत होते. परंतु ऐनप्रसंगी शहादा तालुक्यातील सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील व काँग्रेसच्या हेमलता शितोळे यांच्यापैकी कोणी माघार घ्यावी यावरून सभा चालू असताना रस्सीखेच झाली. जयश्री पाटील यांनी अर्ज माघारी घेतल्यावर हेमलता शितोळे देखील आपोआपच बिनविरोध निवडून आल्या. दरम्यान, ती निवड घोषित होण्याआधीच पत्रकारांसमक्ष जयश्री पाटील या सभा सोडून निघून गेल्या.