दीपोत्सव : फटाके विक्रेत्यांसाठी नियमांची ‘माळ’ | पुढारी

दीपोत्सव : फटाके विक्रेत्यांसाठी नियमांची ‘माळ’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात फटाके विक्री करणार्‍यांसाठी नियमावली असून, नियमांचे पालन करून फटाके विक्री करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधितांना कारावास, आर्थिक दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे घरात फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करणार्‍यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

दिवाळीत प्रदूषण होऊ नये तसेच फटाके विक्री करताना कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यानुसार फटाके विक्रीसाठी जागा निश्चित केली असून, तेथे स्टॉल उभारण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे महापालिका, अग्निशमन विभाग, महावितरण, पोलिस विभागांची परवानगीही घेणे विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे. त्यामुळे विक्रेत्यांना नियमांची पूर्तता करूनच फटाके विक्री करावी लागणार आहे.

मोठ्या स्टॉल्सची उभारणी…
गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह येथे फटाके विक्रेत्यांसाठी खासगी स्टॉल उभारण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून प्रत्येक स्टॉलबाहेर पाण्याचे पिंप, अग्निरोधक यंत्रणा, वाळूने भरलेले भांडे ठेवण्यात आले आहेत. मात्र, प्रशासनाने ठरवून दिलेल्या 10 बाय 10 आकाराचे स्टॉल उभारणे अपेक्षित असताना त्यापेक्षा कैक पटीने मोठे स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच या स्टॉलमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक वजनाचा फटाक्यांचा साठा ठेवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, महापालिकेने उभारलेले गाळे आणि खासगी गाळे यांची नियमावली वेगवेगळी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘त्या’ विक्रेत्यांवरही लक्ष…

 काही विक्रेते फटाक्यांचा घरात साठा करून त्यांची विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी हे विक्रेते सोशल मीडियावरून जाहिरात करून फटाके विक्री करीत आहेत. अनुचित घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात वित्त किंवा जीवितहानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचा इशारा विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे यांनी दिला आहे.

फटाके विक्रेत्यांसाठी नियमावली अशी…
फटाके उडवण्याच्या जागेपासून चार मीटर अंतरापर्यंत 125 डेसिबल आवाज निर्माण करणार्‍या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर करण्यावर बंदी. साखळी फटाक्यांच्या आवाजात 115 डेसिबलपर्यंत मर्यादा असावी. न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहानंतर फटाके उडवण्यास मनाई. परवाना प्राप्त स्टॉलमध्ये 100 किलो फटाके व 500 किलोग्रॅमपर्यंत शोभेच्या फटाक्यांचा साठा ठेवता येणार आहे. प्रत्येक स्टॉलमध्ये तीन मीटरपेक्षा अंतर कमी नसावे तसेच सुरक्षित सीमेपासून 50 मीटरपेक्षा कमी अंतरावर स्टॉलची जागा नसावी. 25 ग्रॅमपेक्षा जड आणि 3.8 सेमीपेक्षा जास्त लांबीचे अ‍ॅटमबॉम्ब व क्लोरटचा समावेश असलेली फटाके विक्री करू नये. 18 वर्षांखालील मुला-मुलींसोबत पालक असल्याशिवाय फटाके विक्री करू नये. आदेशांचा भंग केल्यास आठ दिवसांपर्यंत कारावास किंवा एक हजार 250 रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा अशी तरतूद आहे.

हेही वाचा:

Back to top button