नाशिक : माजी नगरसेवक श्याममकुमार साबळे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी | पुढारी

नाशिक : माजी नगरसेवक श्याममकुमार साबळे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक श्यामकुमार साबळे यांची शिवसेनेच्या ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शिवसेनेच्या तिकिटावर साबळे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. असे असताना पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात ते कधीच सहभागी होत नव्हते. याउलट शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या बैठकांना तसेच कार्यक्रमांना ते उपस्थित राहत असल्याने पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. – सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना (ठाकरे).

बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांचे साबळे हे कट्टर समर्थक आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर ना. दादा भुसे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यापासूनच साबळे यांनी शिवसेनेबरोबर अंतर ठेवले होते. ठाकरे गटाकडून आयोजित बैठका आणि कार्यक्रमांनाही साबळे हजेरी लावत नव्हते की, उपक्रमांत सहभागी होत नव्हते. यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडल्याचे आधीपासूनच ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना ठाऊक होते. माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्यानंतर साबळे यांच्यावरही पक्षाने कारवाई केली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर भुसे समर्थक असल्याची उघडपणे प्रतिक्रिया साबळे यांनी दिली होती. ना. भुसे यांनी बोलविलेल्या बैठकांनाही ते हजर होते. त्यामुळे साबळे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

ना. दादा भुसे यांच्यासोबत आपण असल्याने याआधीच जाहीर केले होते. त्यामुळे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोणत्याही कार्यक्रमांना वा बैठकांना मी हजर नव्हतो. प्रतिज्ञापत्रही भरून दिलेले नाही. याबाबतची कल्पना मी पक्ष कार्यालय तसेच पदाधिकाऱ्यांना दिली होती. असे असताना हकालपट्टी म्हणजे ठाकरे गटाला उशिराने आलेली जागच म्हणावी लागेल. – श्यामकुमार साबळे, माजी नगरसेवक

हेही वाचा:

Back to top button