नाशिक : कामगारांचे वीज भवनासमोर निदर्शने | पुढारी

नाशिक : कामगारांचे वीज भवनासमोर निदर्शने

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
राज्य विद्युत वितरण कंपनीने कामगार संघटनांबरोबर चर्चा करून बदली धोरणाबाबत परिपत्रक काढून अंमलबजावणी सुरू केली होती. मात्र, कंपनीने तीन वर्षांपासून बदल्या करण्याची प्रक्रिया बंद केली आहे. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने वीज भवन येथे आंदोलन केले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवाळी बोनस मिळाला पाहिजे. तसेच गंभीर आजाराने ग्रस्त, पती-पत्नी एकत्रीकरण, सेवानिवृत्तीस काही वर्ष शिल्लक असताना हव्या त्या ठिकाणी बदली, मूळच्या ठिकाणी मागितलेली बदली मिळाली पाहिजे. नवीन कामगार घरापासून शेकडो किलोमीटर दूर आहेत, त्यांना आपल्या भागामध्ये बदली गरजेची असताना ती केली जात नाही. प्रशासनाने छळ सुरू केला आहे. विनंती बदल्यावर शासनाची स्थगिती नाही. राज्य शासनामध्ये सर्व आयएए अधिकार्‍यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या होतात. निर्मिती, पारेषण, शिक्षण आदी विभागांमध्ये बदल्या होतात. परंतु महावितरण कंपनीने सूत्रधारी कंपनीकडे बदल्याची परवानगी मागण्याचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे. नोटीस न देता बदल केले जात आहेत. अपुरे कर्मचारी, बंद असलेली भरती, दुरुस्ती साहित्याचा अभाव, वीजमीटरचा अपुरा पुरवठा, वसुलीच्या नावाखाली कर्मचार्‍यांना होणारी मारहाण, अपघातानंतर कर्मचार्‍यांवर गुन्हे, छोट्या कारणांसाठी शिक्षा देणे, दोषी नसेल तरी किमान 50 हजारांची शिक्षा करणे, पगारवाढ बंद करणे असे प्रघात पडलेले आहेत. कारण नसताना निलंबन केले जात आहे, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी व्ही. डी. धनवटे, जी. एच. वाघ, पंडितराव कुमावत, ललित वाघ, राजेंद्र कुलकर्णी, सतीश पाटील, दीपक गांगुर्डे, महेश कदम, अतुल आगळे, प्राची पाटील, दीपाली मोगल, रघुनाथ ताजनपुरे, बाळासाहेब गोसावी, दत्ताजी चौधरी, रवींद्र गुंजाळ, सुनील साळुंके, भाऊसाहेब कुकडे, तुषार जाधव, बापू जावळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button