रेल्वेची नवी योजना! तिकीट काढा आणि पैसे भरा हप्त्याने… | पुढारी

रेल्वेची नवी योजना! तिकीट काढा आणि पैसे भरा हप्त्याने...

नवी दिल्ली : आयआरसीटीसीच्या अ‍ॅपवरून रेल्वेचे तिकीट काढा आणि पैसे हप्त्याहप्त्याने भरा, ही नवीन योजना रेल्वे खात्याने जाहीर केली आहे. ट्रॅव्हल नाऊ, पे लेटर या योजनेतून प्रवासी रेल्वेच्या तिकिटाचे पैसे तीन ते सहा महिन्यांमध्ये भरू शकणार आहेत. हा ईएमआय पेमेंटचा पर्याय आयआरसीटीसी ट्रॅव्हल अ‍ॅपवर प्रवाशांना चेकआऊट पेजवर मिळेल.

ही सुविधा नियमित व तात्काळ तिकिटांवर सर्व प्रवाशांना मिळू शकेल. ईएमआयसाठी कोणतीही कागदपत्रे त्यांना सादर करावी लागणार नाहीत. आयआरसीटीसी ही भारतीय रेल्वेची उपकंपनी आहे. केटरि ंग, पर्यटन आणि ऑनलाईन तिकिट बुकिंग ही कामे ही कंपनी करते. सध्या 9 कोटींहून अधिक नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केलेले आहे आणि दररोज 15 लाख तिकिटे त्यावरून काढण्यात येतात. कॅश-इ या फिनटेक कंपनीच्या सहकार्याने आयआरसीटीसीने ही योजना राबविली आहे.

या कंपनीचे अध्यक्ष व्ही. रमण कुमार म्हणाले, आता प्रवास करा आणि पैसे नंतर भरा, अशा प्रकारच्या योजना सर्वत्र लोकप्रिय झालेल्या आहेत. त्या अनुषंगानेच आम्ही ही योजना आयआरसीटीसीच्या माध्यमातून आणली आहे आणि आम्ही यातून लाखो प्रवाशांपर्यंत पोेहोचणार आहोत. ही देशातील सर्वात मोठी योजना असून ती अत्यंत सुरळीत व अखंड सुरू राहावी, यासाठी आमचे प्रयत्न असतात.

Back to top button