नाशिकच्या तारांगण पाड्यावरील रुग्णाचा दूषित पाण्यामुळे मृत्यू | पुढारी

नाशिकच्या तारांगण पाड्यावरील रुग्णाचा दूषित पाण्यामुळे मृत्यू

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा
तारांगण पाडा येथील 45 नागरिकांना दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्या सुरू झाल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयात 21 जणांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सकरू शंकर मेघाळ (वय 50) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच पाच रुग्ण गंभीर आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल 21 रुग्णांपैकी 14 महिला असून, सात पुरुष आहेत. पैकी 16 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर तालुका रुग्णालयात दाखल चार रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

तारांगण पाडा येथील 40 पेक्षा अधिक नागरिकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाल्याने तालुक्यातील विविध हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करण्यात आले होते. यात घोटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या गंभीर घटनेची दखल आ. हिरामण खोसकरांनी घेतली. माहिती समजताच आमदार हिरामण खोसकर यांनी तातडीने भेट देऊन तेथे घडलेला प्रकार जाणून घेतला. यावेळी खोसकर यांनी तातडीने आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी यांच्या टीमला उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले.

सद्यस्थितीत तारांगण पाड्यावर वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक तळ ठोकून आहेत. जलप्रदूषण नियंत्रित करण्यात आले असून, येथील नागरिकांना वैद्यकीय सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच दूषित पाणी नष्ट करून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. वैद्यकीय पथकाने नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत
– डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी

हेही वाचा :

Back to top button