नाशिक : शहराला प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव | पुढारी

नाशिक : शहराला प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या अमृत-२ अभियानांतर्गत नाशिक शहरासाठी ३५० कोटींचा पाणीपुरवठा योजनेचा सुधारित प्रस्ताव मागील महिन्यातच राज्य शासनाकडे सादर केला असून, या योजनेंतर्गत शहरातील १२ जलकुंभांच्या वितरण झोनमध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. प्रायोगिक तत्त्वावर अशा स्वरूपाचे नियोजन आहे.

शहराचा वाढता विस्तार आणि येत्या पाच वर्षांत नाशिकमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असून, नव्याने विकसित झालेल्या वसाहतींमध्येदेखील जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात येणार आहे. त्यासाठी आधी २२६ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, प्रस्तावात अनेक बदल करण्यात आल्याने तसेच आधीचा प्रस्ताव सादर करून जवळपास चार वर्षांचा कालावधी उलटलेला असल्याने, आता नव्याने तयार झालेला प्रस्ताव ३५० कोटींचा झाला आहे. त्यास तत्त्वत: मान्यता देत तांत्रिक तपासणीसाठी तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या योजनेंतर्गत २२ किमीच्या सिमेंटच्या जुन्या जलवाहिन्यांच्या ठिकाणी अधिक व्यासाच्या नवीन लोखंडी जलवाहिन्या, गावठाणातील जुन्या जलवाहिन्यांच्या जागी १०० किमी लांबीच्या जलवाहिन्या आणि शहरातील नव्याने विकसित झालेल्या भागात ८५ किमी लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे.

भविष्यकालीन पाणी नियोजनाचा एक भाग म्हणून शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक तरतुदीही केल्या जाणार आहेत. त्यानुसार सध्या असलेल्या ११५ आणि नव्याने विकसित होत असलेल्या १६ अशा एकूण १३२ जलकुंभांपैकी १२ जलकुंभांच्या वितरण क्षेत्रात २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग केला जाणार आहे. २४ तास पाणीपुरवठा होणार असला, तरी संबंधित क्षेत्रातील नळजोडणीधारकांना पाणीपट्टीपोटी जादा दर मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा २४ तास होणारा पाणीपुरवठा नागरिकांना कितपत परवडेल, याबाबत शंकाच आहे.

हेही वाचा:

Back to top button