व्हिडीओ गेममुळे मुलांना हृदयविकाराचा धोका | पुढारी

व्हिडीओ गेममुळे मुलांना हृदयविकाराचा धोका

सिडनी : व्हिडीओ गेम्समुळे मुलांचे मनोरंजन होत असले आणि काही प्रमाणात त्यांची एकाग्रताही वाढत असली तरी अशा गेम्सच्या अतिरेकाने त्यांना हृदयविकाराचाही त्रास होऊ शकतो. एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की व्हिडीओ गेम खेळण्याच्या सवयीने मुलांमध्ये हृदयासंबंधीचे आजार होऊ शकतात.

‘हार्ट र्‍हीदम’ मध्ये प्रकाशित एका अहवालानुसार हृदयासंबंधी आधीपासून काही त्रास जाणवत असलेल्या मुलांमध्ये व्हिडीओ गेम्समुळे हृदयाच्या स्पंदनात वाढ होऊ शकते. स्पंदनातील लय बदलणे हे मुलांच्या मृत्यूचेही कारण बनल्याचे दिसून आले आहे. ऑस्ट्रेलियात संशोधकांनी 22 प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला.

व्हिडीओ गेम्स खेळत असताना मुली हृदयातील लयीत येणार्‍या अडथळ्यांचा देखील सामना करीत होते, असे लक्षात आले. अभ्यास प्रकल्पात सहभागी मुलांचे वय मात्र स्पष्ट केलेले नाही. मात्र, अनेक मुलांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याचे स्पष्ट झाले. व्हिडीओ गेममध्ये झटके बसतात व ते मुलांसाठी धोकादायक बनू शकते. मुलांना गेमिंगदरम्यान ब्लॅकआऊटचा अनुभव येतो, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे.

Back to top button