नाशिक : महिलांनी राजकारणात यावे – माजी शिक्षणमंत्री फौजिया खान | पुढारी

नाशिक : महिलांनी राजकारणात यावे - माजी शिक्षणमंत्री फौजिया खान

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
महिलांनी शिक्षण आणि राजकारणात आपली भूमिका निभावली पाहिजे, तरच समाजात बदल घडून येतील, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री फौजिया खान यांनी केले.

विविध महिला संघटना आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने लोटस लॉन्समध्ये आयोजित सभेमध्ये गुरुवारी (दि. 13) त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार शेख रशीद, माजी महापौर ताहेरा शेख, माजी सभागृहनेते असलम अन्सारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 1994 मध्ये महिलांसाठी विशेष धोरण तयार करून त्यांना सन्मानाचे आणि समानतेचे स्थान दिले. त्यांनीच महिलांना राजकारण आणि नोकरीत समान दर्जा मिळवून दिला, असे सांगत खान यांनी, गिरणा पाणीपुरवठा योजना राबवून शहराचा पाणीप्रश्न निकाली काढण्याचे श्रेय शेख रशीद यांना जाते, अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव केला. 40 वर्षांची कारकीर्द प्रेरणादायी असून, भविष्यातही हिंमत आणि जिद्दीने काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. ताहेरा शेख यांनीही महिलांनी ठरविले, तर नागरी समस्या सहज सुटतील, असे मत मांडले. राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्या आशा मुरघे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी यास्मीन सय्यद, शाहिना अन्सारी, शकील बेग, एजाज उमर, इरफान अली आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, माजी मंत्री खान यांनी अल्पसंख्याक समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी हज कमिटीमध्ये सहविचार सभा घेतली. त्यात विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्राविषयी समस्या मांडल्या.

अजित पवार आज मालेगावात
राजकारण व समाजकारणातील 40 वर्षांच्या वाटचालीनिमित्त माजी आमदार रशीद शेख यांचा शुक्रवारी सायंकाळी नूरबागमध्ये नागरी सत्कार होणार आहे. त्यास विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपसभापती नरहरी झिरवाळ यांची प्रमुख उपस्थिती असेल. मान्यवरांना दीड किलोची चांदीची तलवार आणि मुकुट भेट देण्यात येणार आहे. यावेळी 50 हजार श्रोत्यांच्या बसण्याची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा:

Back to top button