बायोग्राफी : आ. भुजबळांच्या जीवनावरील पुस्तकाचे आज प्रकाशन | पुढारी

बायोग्राफी : आ. भुजबळांच्या जीवनावरील पुस्तकाचे आज प्रकाशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांचा 15 ऑक्टोबर रोजी 75 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्या निमित्ताने छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.13) दुपारी 1.30 वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

या सोहळ्यास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला, डॉ. जावेद अख्तर, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान व विजय सामंत यांनी लिहिलेल्या छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे आणि 75 निवडक छायाचित्र पुस्तिकेचेही मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात येणार आहे. या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यभर सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये विशेषतः सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम राज्यभर घेतले जाणार आहे. गौरव समितीमध्ये समन्वयक खा. प्रफुल्ल पटेल यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. कपिल पाटील, आ. सचिन अहिर यांचा समावेश आहे.

हेही वाचा:

Back to top button