टाकळी हाजी : रस्ता कामात ठेकेदाराचा आडमुठेपणा; प्रवाशांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना | पुढारी

टाकळी हाजी : रस्ता कामात ठेकेदाराचा आडमुठेपणा; प्रवाशांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना

टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा: टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे रस्त्याचे काम सुरू आहे. यात ठेकेदार आडमुठेपणा करीत असल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना तसेच व्यावसायिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शिरूर-नारायणगाव रस्त्यावरील टाकळी हाजी येथे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ऐन पावसाळ्यात पाऊस चालू असताना या ठेकेदाराने रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील पुलाचे काम करण्यासाठी रस्ता खोदला असून, वाहतूक पर्यायी मार्ग तयार करून वळवून दिली आहे.

मात्र, हा पर्यायी मार्ग व्यवस्थित बनविला नाही. तेथे जड वाहने तर सोडा; पण हलकी चारचाकी वाहने देखील रुतून रस्ता बंद होत आहे.
पर्यायी मार्ग जिथे बनविला आहे तो अतिशय अरुंद रस्ता असून, तेथे मोठ्या प्रमाणात चिखल पसरला आहे. त्यामुळे दुचाकी वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. बुधवारी (दि. 12) सकाळी तेथे वाहने रुतल्याने दूध वाहतूक, शाळेच्या बस, व्यावसायिक, कंपनीमध्ये कामास जाणारे कामगार सर्वजण अडकून पडले होते.

रस्त्याचे भरपूर काम बाकी असताना पावसाच्या दिवशीच रस्त्यावरील पूल खोदून लोकांची तारांबळ केल्याने स्थानिक व्यावसायिक आणि प्रवासी ठेकेदारावर नाराजी व्यक्त करीत आहेत. संबंधित ठेकेदार हा राजकीय व्यक्तीच्या मर्जीतील असल्याने बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

 

Back to top button