जिल्हा परिषद : एनजीओ सीएसआरसाठी संकेतस्थळावर विशेष टॅब | पुढारी

जिल्हा परिषद : एनजीओ सीएसआरसाठी संकेतस्थळावर विशेष टॅब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक सामाजिक संस्था या ग्रामीण भागात कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेतील अनेक विभागांसोबत सामाजिक कृतज्ञता निधीच्या माध्यमातून सामाजिक संस्थांना काम करण्याची इच्छा असते, अशा संस्थांना आता हव्या त्या विभागात काम करता येणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यासंदर्भात आवाहन केले आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर विशेष टॅब देण्यात आला असून, यामध्ये सामाजिक संस्थेचे नाव, त्यांना कोणत्या विभागात काम करावयाचे आहे, विशिष्ट तालुका, गाव याबतचा तपशील भरल्यानंतर जिल्हा परिषदेतर्फे या सामाजिक संस्थांना बोलावण्यात येऊन आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याचा आवाका बघता, अनेक सामाजिक संस्था या शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्यातील विविध ठिकाणी काम करताना दिसतात.
शालेय शिक्षण, आरोग्य, कुपोषण निर्मूलन अशा विविध प्रश्नांवर शासकीय यंत्रणेसोबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थांना काम करण्याची इच्छा असते. अशा सर्व संस्थांना जिल्हा परिषदेच्या या पुढाकारामुळे जिल्ह्यातील हव्या त्या ठिकाणी काम करणे आता शक्य होणार आहे.

ज्या सामाजिक संस्था व खासगी कंपन्यांना सामाजिक कृतज्ञता निधी अथवा स्वयंस्फूर्तीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काम करायचे आहे, त्या संस्थांनी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर भेट देऊन, ज्या विभागात काम करायचे आहे, तो विभाग, तालुका आणि गाव याबद्दल माहिती भरल्यास ग्रामीण भागात काम करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात येईल. – आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., नाशिक.

हेही वाचा:

Back to top button