नाशिक : परतीच्या पावसामुळे भात पिकांना फटका !

भात पिकांना फटका,www.pudhari.news
भात पिकांना फटका,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक, देवगाव : पुढारी वृत्तसेवा

सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व विशेषत: गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने हळव्या व निमगरव्या भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. हळव्या भात पिकाला फुलोरा येऊन त्याचे परागकण होऊन दुधाळ पदार्थाने दाणा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पावसामुळे परागकण वाहून जाऊन दाणा व्यवस्थित भरत नाही. उशिराने लागवड केलेल्या हळव्या व निमगरव्या भात पिकाला अनेक ठिकाणी फुलोरा आला आहे. मात्र तो मुसळधार पावसामुळे धुऊन गेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून 'निसर्गानं दिलं परंतु पावसाने हिरावलं' अशी स्थिती निर्माण झाली आहे.

यावर्षी मूळातच पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या. मात्र नंतर पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने लागवडीची कामे मात्र वेळेवर आटोपली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतकरी हळवे, गरवे व निमगरवे अशा तीन प्रकारच्या वाणांची लागवड शेतकरी करतात. मात्र, ढगाळ आणि रिपरिप पावसामुळे भात पिकांना फटका बसला आहे. पावसाबरोबर करपा रोगामुळेही शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. हळव्या भाताची पिके पसवू लागली असून अनेक ठिकाणी भाताच्या लोंब्या दिसू लागल्या आहेत. सातत्याने आणि जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होत आहे. भातशेतीत साठून राहिलेल्या पाण्यामुळे पिके गारठून त्यांची वाढ खुंटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

जून महिन्यात बरेच दिवस पाऊस गायब झाला होता. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली त्यानंतर येथील शेतकऱ्यांनी भात पिकांच्या लागवडीला सुरुवात केली. परंतु काही ठिकाणी भात रोपे ही तयार नसल्यामुळे भाताची लावणी करण्यासाठी आगस्ट महिना उजाडला.

दरम्यान कमी अधिक पडणारा पाऊस गतवर्षीच्या तुलनेत मुबलक झाला. मात्र, पावसाच्या अनियमितपणामुळे यंदा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. परंतु याही स्थितीत भाताचे पीक शेतात बहरू लागल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सरत्या पावसाने शेतात उभ्या असलेल्या पिकांना धोका निर्माण केला आहे. जोराच्या पावसाबरोबर वारा देखील असल्याने भाताचे पीक शेतात कोसळून पडेल याची भीती देखील शेतकऱ्यांना वाटत आहे. यंदा भाताचे पीक भरपूर होईल ही येथील छोट्या शेतकऱ्यांची आशा या कोसळणाऱ्या पावसामुळे ती मावळू लागली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news