नाशिक : लखमापूर शिवारात बिबट्या जेरबंद | पुढारी

नाशिक : लखमापूर शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

लखमापूर येथील हनुमानवाडी शिवारात गेली कित्येक दिवस धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर धीरज काळे व निवृत्ती विश्वनाथ देशमुख यांच्या शेताच्या बांधावर ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यात अखेर जेरबंद झाला. अद्यापही या परिसरात आणखी दोन बिबट्यांचा संचार सुरू असून, त्यांनाही पकडण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे.

बिबट्यामु‌ळे सर्वांत जास्त नुकसान या शिवाराने गेल्या अनेक दिवसांपासून अनुभवले होते. लहान बालकांपासून तर वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा या बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेले आहेत. त्यात काही गंभीर जखमी झाले, तर काही बालकांना आपला जीव गमवावा लागला. हनुमान वाडीतील वस्तींवर राहणाऱ्या लोकांना अगदी जीव मुठीत घेऊन शेतीचे कामे करावे लागत होते. बिबट्याच्या हल्ल्यांमुळे वनविभागाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. अखेर वनविभागाला शनिवारी रात्री मोठे यश मिळाले. याठिकाणी कायमस्वरूपी पिंजरे लावले जात होते. तरी पण बिबट्या त्यात अडकत नव्हता, अनेकदा तर बिबट्या पिंजऱ्यावर बसलेला येथील नागरिकांनी अनेकदा बघितला होता.

हनुमानवाडी परिसरात तीन बिबट्यांचे वास्तव्य आहे. त्यापैकी एकच जेरबंद झाला आहे. दोन बिबट्यांसाठी परत पिंजरा लावण्यात आला आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना त्वरित माहिती मिळताच काही वेळातच ते घटनास्थळी आले आणि विशेष वाहनाने बिबट्याला घेऊन गेले. रेंज फॉरेस्ट अधिकारी जोशी, सहायक वनसंरक्षक मोरे, वनपाल परिमंडळ अधिकारी रामचंद्र तुंगार, वनरक्षक अण्णा टेकनर, हेमराज महाले, परसराम भोये, रेश्मा पवार आदी कर्मचारी घटनास्थळी त्वरित दखल झाले. आणखी पिंजरे या ठिकाणी मागविण्यात आल्याची माहिती वनविभागचे परिमंडळ अधिकारी रामचंद्र तुंगार यांनी दिली.

हेही वाचा:

लखमापूर : हनुमान वाडी-वस्तीवर जेरबंद झालेला बिबट्या. (छायाचित्र : समाधान पाटील)

Back to top button