नाशिक : ऑक्टोबरच्या मध्यात १२ धरणांचा विसर्ग कायम | पुढारी

नाशिक : ऑक्टोबरच्या मध्यात १२ धरणांचा विसर्ग कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

यंदाच्या वर्षी पावसाने कृपावृष्टी केल्याने जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमध्ये काठोकाठ पाणीसाठा झाला आहे. धरणांमध्ये सध्या ६५ हजार ३८० दलघफू साठा आहे. तूर्तास पावसाने विश्रांती घेतली असली, तरी उपलब्ध पाणीसाठा बघता ऑक्टोबरच्या मध्यात निम्म्या धरणांमधील विसर्ग कायम आहे.

यंदा जूनमध्ये पावसाने आखडता हात घेतला असला, तरी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत त्याने सारी कसर भरून काढली. त्यामुळे जिल्ह्यातील विहिरी काठोकाठ भरल्या असून, पाण्याचे स्रोतही पुरुज्जीवित झाले आहेत. प्रमुख धरणेही पूर्ण क्षमतेने भरली आहेत. नाशिक शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गंगापूर समूहातील चारही प्रकल्प मिळून १०,१३३ दलघफू पाणीसाठा निर्माण झाला असून, त्याचे प्रमाण १०० टक्के आहे. इगतपुरीमधील दारणा समूहातील सहा प्रकल्पांत १८ हजार ७११ दलघफू म्हणजेच ९९ टक्के साठा आहे. पालखेड व ओझरखेड समूहातील प्रत्येकी तिन्ही प्रकल्प काठोकाठ भरले आहेत. त्यामध्ये अनुक्रमे ८,२९६ व ३,१९८ दलघफू इतका साठा आहे. गिरणा खोऱ्यातील चणकापूर समूहातील पाचही प्रकल्प मिळून एकूण २३ हजार ५१ दलघफू साठा (१०० टक्के) आहे, तर पुनदमधील दोन्ही प्रकल्प मिळून १,६३० दलघफू साठा असून, त्याचे प्रमाण ९९ टक्के इतके आहे. दरम्यान, धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा तसेच परतीच्या मान्सूनचा अंदाज बघता, २४ पैकी तब्बल १२ धरणांमधून पाण्याचा विसर्ग कायम आहे.

विसर्ग (क्यूसेकमध्ये)

दारणा २५०, वालदेवी ६५, आळंदी ३०, पालखेड ४३७, नांदूरमध्यमेश्वर १,६१४, ओझरखेड ४४, भावली २६, चणकापूर ३७९, हरणबारी २५१, केळझर ७५, नागासाक्या २१२, गिरणा ४,९५२.

धरणांवर एक दृष्टिक्षेप

प्रमुख धरणे : २४

एकूण उपयुक्त साठा : ६५,६६४ दलघफू

आजचा उपयुक्त साठा : ६५,३८० दलघफू

टक्केवारी : १००

हेही वाचा:

Back to top button