बिमा सुलभ ई-क्रांती | पुढारी

बिमा सुलभ ई-क्रांती

अर्थज्ञान, प्रा.डॉ. विजय ककडे

बिमा सुगम किंवा विमा विनिमय केंद्र याची स्थापना करण्यास ‘इर्डा’ने मान्यता दिली असून, पुढील वर्षी जानेवारी 2023 पासून ते कार्यरत होईल. बिमा सुगम हे विमा ग्राहकांना अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे. कारण, यामध्ये सर्व व्यवहार डीमॅट स्वरूपात -‘पेपर लेस’ होतात. यात बदली सक्षमता portability हा फायदा सर्वात महत्त्वाचा आहे.

विविध प्रकारच्या आपत्तीतून नुकसान टाळण्यासाठी सर्वसाधारण विमा उपयुक्त ठरतो. आरोग्य विमा आजारपणातून येणारी आर्थिक जोखीम कमी करतो. विम्याचे हे विविध प्रकार आवश्यक असले तरी व्यक्तिगत पातळीवर त्याची सर्वजण निवड करतातच असे नाही. त्यामुळे विमा ही आग्रहाची बाब बनते. विमा व्यवसायाने खासगीकरण, राष्ट्रीयीकरण, विदेशी संस्था सहभाग अशा महत्त्वाच्या टप्प्यांतून प्रवास केला असून, आता ‘तंत्रसुधार’ टप्प्यात एक नवा अध्याय किंवा महत्त्वपूर्ण वळण 2023 पासून ‘बिमा सुगम’ किंवा ‘विमा विनिमय केंद्र’ यातून होत आहे. ही महत्त्वाची परिवर्तन क्रांती ग्राहक हितास अनेक उपयुक्त सेवासुविधा देणारी ठरेल असे वाटते.

विमा क्षेत्राचे नियमन व विकास यासाठी इर्डा IRDAI-insurance Regulation & Developmant Authority of India ही संस्था कार्य करते. सध्या एकूण 57 विमा कंपन्या कार्यरत असून, त्यामध्ये 24 आयुर्विमा व 33 सर्वसाधारण विमासेवा देतात. गेल्या 5 वर्षांत विमा व्यवसाय 19 टक्क्यांनी वाढला असून, पुढील 5 वर्षांत 30 टक्के वेगाने वाढणार असल्याचा अंदाज आहे. वाढते उत्पन्न, विमा जागरूकता व तंत्रसुधार यातून हे शक्य होणार आहे. यासाठी बिमा सुगम किंवा विमा विनिमय सुविधा महत्त्वपूर्ण ठरते.

बिमा सुगम स्वरूप

बिमा सुगम किंवा विमा विनिमय केंद्र याची स्थापना करण्यास इर्डाने मान्यता दिली असून, पुढील वर्षी जानेवारी 2023 पासून ते कार्यरत होईल. यासाठी 85 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यात आयुर्विमा महामंडळ 30 टक्के (25कोटी) ऑनलाईन पॉलिसिब्रोकर 35 टक्के (30 कोटी) व विमा एजंट इतर 5 टक्के योगदान देणार आहेत. या बिमा सुगम यंत्रणेशी पॉलिसीधारक, वित्त कंपन्या यांच्याबरोबर इन्शुरन्स इन्फर्मेशन ब्युरो, यूडीई uidai सीडीएसआयएल या संस्था निगडित असणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातून सर्व सुविधा एकत्र व एकच ठिकाणी मिळणार आहेत. हा ग्राहकांचा सर्वात मोठा फायदा आहे. विमा पॉलिसी घेणे, जुनी-नवी करणे, क्लेम किंवा दावा पूर्तता, तक्रार निवारण हे सर्व एकाच संस्थेतून ऑनलाईन उपलब्ध होणार असून, कागदपत्रांची जंत्री व त्यातून ग्राहकास होणारा मनस्ताप व खर्चाचा भुर्दंड वाचणार आहे!

विमा ग्राहकांना फायद्याचे

बिमा सुलभ हे विमा ग्राहकांना अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे. कारण, यामध्ये सर्व व्यवहार डीमॅट स्वरूपात -‘पेपर लेस’ होतात. यात बदली सक्षमता portability हा फायदा सर्वात महत्त्वाचा आहे. आता जसे मोबाईल सेवा आपण जियोऐवजी बीएसएनएल अशी किंवा इतरांशी बदलतो; परंतु नंबर तोच राहतो तसे पॉलिसी तीच, पण सेवा संस्था बदलू शकतो. यातून ग्राहकास उत्तम सेवा (स्पर्धात्मक) प्राप्त होतील. ग्राहक दुसर्‍या शहरात/राज्यात गेला तरी त्याला एजंट बदलणे आता सहज शक्य होईल. ही एजंट बदल सुविधाही यातून मिळणार आहे. सर्व विमा पॉलिसी सीडीएसआयएल अथवा एनएसडीएल यांच्याकडे संरक्षित असणार आहेत.

सध्या आरोग्य विमा विस्तारण्यासाठी opd खर्चाचाही समावेश होणे आवश्यक असून, तशा प्रकारचा विमा एखादी नवी कंपनी देऊ शकेल. वाढत्या उत्पन्नासोबत विमा क्षेत्राचा विस्तार झाल्याने देशाच्या विकासाला आवश्यक भांडवल यातून उपलब्ध होईल. विमातंत्र सुधार ते वित्ततंत्र सुधार असा प्रवास सुलभ होईल. सर्व माहिती एकत्रित उपलब्ध झाल्याने प्रत्येक कुटुंबात किती व कोणता विमा आहे व ते आणखी कोणता विमा घेणे आवश्यक आहे ही सर्व माहिती विमा विस्तारास उपयुक्त ठरते.

आव्हान!

बिमा सुलभ व 5-जी तंत्रप्रगती दशकात विमा व्यवसायाचे स्वरूप बदलणारी ठरेल. यासाठी ई-साक्षरता व ई-फसवणूक याबाबत सातत्याने जागरूकता आवश्यक ठरते. योग्य त्या सुरक्षातंत्राच्या स्वीकारातून विमा क्षेत्र स्पर्धात्मक होताना ग्राहक वाढविण्याइतके टिकवण्याचे आव्हान विमा एजंट व विमा कंपन्यांना करावे लागेल. सर्व वित्तसुविधा म्हणजे बँक, म्युच्युअल फंड, शेअर्स, विमा एकत्रित देणारी फिनटेक ही नव्या काळाची गरज असेल. ‘बिमा सुलभ’ ही नवी ई-पहाट एक महत्त्वाचे परिवर्तन ठरेल.

Back to top button