नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती महाराज ब्रह्मलीन | पुढारी

नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती महाराज ब्रह्मलीन

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
आनंद आखाड्याचे श्रीमहंत, अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज शनिवारी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी ब्रह्मलीन झाले. आपल्या शंभरी गाठत आलेल्या आयुष्यात लाखोंच्या संख्येने भक्त आणि हजारोंच्या संख्येने शिष्य तयार करणार्‍या स्वामींनी येथील आनंद आखाड्यात आपला देह ठेवला. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, ना. गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह आजी- माजी आमदार व हजारो शिष्यांनी हजेरी लावली.

स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांचा जन्म 1927मध्ये नांदेडजवळच्या देवाची वाडी येथे झाला. वयाच्या 10 व्या वर्षी ते घराबाहेर पडले. त्यांनी काही काळ, रामेश्वर, बद्रीनाथ, तर काही काळ काशी येथे वास्तव्य केले. प्रारंभी काही वर्षे त्यांनी वारकरी संप्रदायात घालविले. या कालावधीत संत गाडगेबाबा यांच्या सहवासात ते आले. त्यांच्या कीर्तनात टाळकरी म्हणून साथ दिली. मामासाहेब दांडेकर आणि वारकरी संप्रदायातील विभूतींसोबत त्यांचा प्रवास सुरू होता. सन 1962 मध्ये ते त्र्यंबकेश्वरला आले. तपोनिधी श्री पंचायती आनंद आखाड्यात त्यांनी संन्यास घेतला. 1968 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यात ते सहभागी झाली होते. 1980 च्या सिंहस्थात त्यांचा मुख्य सहभाग राहिला. शासन अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि समाज यांच्यात त्यांनी नेहमीच समन्वय साधला. अनेक राजपत्रित अधिकारी, आजी- माजी मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले होते. त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी वारकरी शिक्षणसंस्था स्थापन केली. त्यांनी काही काळ विश्व हिंदू परिषदेतही काम केले.

आनंद आखाड्यात दिली समाधी : 
स्वामी सागरानंद सरस्वती यांना सायंकाळी 6 ला आनंद आखाड्यात सूर्यमंदिराच्या शेजारी समाधी देण्यात आली. तत्पूर्वी गणपतबारी आश्रमापासून ते त्र्यंबकेश्वर शहरात प्रमुख मार्गाने त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. त्यात साधू-संत, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

हेही वाचा:

Back to top button