पुणे : 20 कोटीच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण; गजा मारणे टोळीतील चौघांना बेड्या | पुढारी

पुणे : 20 कोटीच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण; गजा मारणे टोळीतील चौघांना बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरात कुख्यात गजा मारणे टोळी पुन्हा सक्रिय झाली असून व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला वीस कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खंडणी विरोधी पथक दोनने हा त्यांचा डाव हाणून पाडताना गजा मारणे टोळीतील चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. हेमंत पाटील, पप्पू घोलप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. तर अपहरण करण्यात आलेल्या व्यावसायिकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेले व्यावसायिक यांचा रिअल इस्टेट व शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय असून संशयित आरोपी हेमंत पाटील यांनी त्यांच्याकडे शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवले होते. फिर्यादी यांच्याकडून त्यातील काही रक्कम न मिळाल्याच्या कारणावरून गजा मारणे या टोळीतील आरोपींनी फिर्यादीवर पाळत ठेवून त्यांचे सात ऑक्टोबरला सायंकाळी कात्रज येथून अपहरण केले.

यावेळी सूर्य आधी व त्यांचा मित्र श्रीकांत जाधव अशा दोघांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून यांचे अपहरण करण्यात आले, मुंबई बेंगलोर हायवे रोडने रात्रभर वेगवेगळ्या गाडीमधून फिरवून फिर्यादीवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण केली. तसेच त्यांची गाडी काढून घेत त्यांना वीस कोटीची खंडणी मागितली, खंडणी न दिल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतीत खंडणी विरोधी पथक दोनला याची माहिती मिळाल्यानंतर शिताफीने चौघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले गजा मारणे टोळीतील सदस्य असून या घटनेनंतर गजा मारणे टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

Back to top button