नाशिक : नजर आणेवारीत जिल्ह्यातील गावे झाली पास | पुढारी

नाशिक : नजर आणेवारीत जिल्ह्यातील गावे झाली पास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंदाच्या वर्षी पावसाने केलेल्या कृपावृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील 1 हजार 962 गावे नजर आणेवारीच्या पाहणीत 50 पैशांच्या वर असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याच्या द़ृष्टीने ही समाधानकारक बाब आहे.

शासनाच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी पावसाळ्यानंतर जिल्हानिहाय गावांची आणेवारी तीन टप्प्यांत घोषित करण्यात येते. त्यामध्ये सप्टेंबरअखेर नजर आणेवारी, ऑक्टोबरअखेरीस प्रत्यक्ष तसेच 15 डिसेंबरपर्यंत अंतिम आणेवारी जाहीर होते. आणेवारी काढताना खरीप व रब्बी हंगामातील 50 पैशांच्या आतील आणि वरील असा गावांचा आढावा घेतला जातो. 50 पैशांच्या वर गावे असल्यास, तेथे दुष्काळी परिस्थिती व अन्य उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत नाही. पण, 50 पैशांच्या आतील गावांमध्ये पीक कापणी प्रयोग घेताना ग्रामस्थांसाठी शासनाला सर्वतोपरी उपाय करावे लागतात. जिल्ह्यात चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या 130 टक्के पर्जन्याची आतापर्यंत नोंद झाली असून, परतीचा पाऊस बाकी आहे. त्यातच प्रशासनाने सप्टेंबरअखेरीस केलेल्या नजर पाहणीत खरिपाची 1 हजार 679 तसेच रब्बी हंगामातील 283 अशी 1 हजार 962 गावांची आणेवारी 50 पैशांच्या वर असल्याचे दिसून आले. तसेच पावसाचे प्रमाण आणि पाण्याची उपलब्धता बघता, प्रत्यक्ष व अंतिम पाहणीतदेखील ही सर्व गावे 50 पैशांच्या वर राहण्याची शक्यता आहे.

नजर आणेवारी पाहणी अशी…
खरीप गावे : 1679
रब्बी गावे : 283
एकूण : 1962

हेही वाचा:

Back to top button