नगर : साडेबारा लाख बालकांना जंतनाशक गोळ्या | पुढारी

नगर : साडेबारा लाख बालकांना जंतनाशक गोळ्या

नगर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेनिमित्त 10 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील 12 लाख 21 हजार 17 मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. यामध्ये 5 हजार 881 अंगणवाड्यांतून 2 लाख 96 हजार 95 बालकांना आणि 5 हजार 365 शाळांमधून 9 लाख 24 हजार 922 मुला-मुलींना या गोळ्या वाटण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वयोगटातील अंदाजे 28 टक्के मुलांना आतड्यांमधील जंतांपासून धोका आहे. आतड्यांतील कृमीदोष हा बालके व किशोरवयीन मुला-मुलींमधील रक्तक्षय व कुपोषणास जबाबदार आहे.

त्यामुळे मुला-मुलींच्या शिक्षण व प्रकृतीवर विपरीत परिणाम होतो. तीव्र कृमीदोष असलेले विद्यार्थी आजारी असतात. त्यांना लवकर थकवा येतो व अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करु शकत नाहीत. आतड्यांतील कृमीदोष हे वैयक्तीक व परिसर अस्वच्छतेमुळे होतात. बालकांमध्ये याचा प्रसार दुषित मातीद्वारे सहजतेने होतो. शाळा व अंगणवाडी पातळीवरुन देण्यात येणारी जंतनाशक गोळी ही परिणामकारक आहे.
मोहिमेचा उद्देश 1 ते 19 वयोगटातील मुला-मुलींना अंगणवाडी व शाळेत जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य, पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखाने व महापालिकेतील सर्व वैद्यकिय अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेनिमित्त 10 ऑक्टोबर रोजी शाळांमधील 6 वर्ष ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुलां-मुलींना तसेच अंगणवाडी केंद्रांमध्ये 1 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जे लाभार्थी या दिवशी आजारी असतील किंवा इतर कारणांमुळे गोळी घेणे शक्य झाले नाही, त्यांना 17 ऑक्टोबर रोजी शाळा व अंगणवाडी केंद्रामध्ये ‘मॉप अप दिनी’ गोळी देण्यात येणार आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी केले आहे.

Back to top button