Nobel Peace Prize : शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; एलेस बियालियात्स्की आणि रशियन-युक्रेनियन संघटनेचा गौरव | पुढारी

Nobel Peace Prize : शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; एलेस बियालियात्स्की आणि रशियन-युक्रेनियन संघटनेचा गौरव

पुढारी ऑनलाईन डेस्क : Nobel Peace Prize : स्वीडिश अॅकडमी ऑफ सायन्सने आज (दि. 7) शांततेच्या नोबेल पुरस्कारची घोषणा केली. बेलारूसमधील मानवाधिकार वकिल एलेस बियालियात्स्की, रशियन मानवाधिकार संघटना ‘मेमोरियल’ आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना ‘सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज’ यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑस्लो येथील नॉर्वेजियन नोबेल इन्स्टिट्यूटमध्ये येथील कार्यक्रमात नोबेल समितीने याची घोषणा केली. हा पुरस्कार मानवाधिकार कार्यकर्ते आणि संघटनांच्या अथक प्रयत्नांवर प्रकाश टाकणारा असून संघर्ष टाळण्यासाठी आणि मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एलेस बिलियात्स्की आणि रशियन-युक्रेनियन संघटनांचा गौरव करण्यात आल्याचे नोबेल समितीने सांगितले.

1. बेलारूसमधील लोकशाही चळवळीचे एलेस बियालियात्स्की

बेलारूसमध्ये 1980 च्या दशकाच्या मध्यात लोकशाही चळवळीचा उदय झाला. एलेस बियालियात्स्की हे त्या चळवळीच्या आरंभकर्त्यांपैकी एक आहेत. त्यांनी बेलारूसमध्ये लोकशाही आणि शांततापूर्ण विकासासाठी आपले जीवन समर्पित केले आणि ते सातत्याने मानवी हक्कासाठी कायद्याच्या चौकटीत राहून संघर्ष करत राहिले. त्यांनी 1996 मध्ये विआस्ना (स्प्रिंग) या संस्थेची स्थापना केली. राजकीय कैद्यांवर पोलिस आणि सरकारी अधिकार्‍यांकडून केलेल्या छळाचा दस्तऐवजीकरण आणि निषेध करण्यात ‘विआस्ना’ने कायदेशीर लढा उभारला. सरकारी अधिकाऱ्यांनी वारंवार एलेस बियालियात्स्की यांचा लढा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी 2020 पासून, ते आतापर्यंत बियालियात्स्की यांना कोणत्याही ट्रायल खेरीज ताब्यात घेण्यात आले आहे. प्रचंड वैयक्तिक त्रास सहन करूनही बेलारूसमधील मानवाधिकार आणि लोकशाहीसाठीच्या लढ्यासाठी बियालियात्स्की यांनी एक इंचही माघार घेतलेली नाही, असे नॉर्वेजियन नोबेल समितीने नमूद केले.

2. रशियन मानवाधिकार संघटना ‘मेमोरियल’

‘मेमोरियल’ या मानवाधिकार संघटनेची स्थापना 1987 मध्ये करण्यात आली. तत्कालीन सोव्हिएत युनियनमधील (आताचा रशिया) मानवाधिकार कार्यकर्त्यांनी यात पुढाकार घेतला. कम्युनिस्ट राजवटीच्या दडपशाहीचे बळी कधीही विस्मरणात जाऊ नयेत. त्यांच्या संघर्षाच्या स्मृती नेहमी आठवणीत रहाव्यात असा या संघटनेच्या स्थापने मागचा उद्देश होता. चेचेन युद्धांदरम्यान, ‘मेमोरियल’ने रशिया आणि रशिया समर्थक सैन्याने केलेल्या अत्याचार आणि युद्ध गुन्ह्यांची माहिती जगासमोर आणली.

3. द सेंटर फॉर सिव्हील लिबर्टीज (The Center for Civil Liberties)

युक्रेनमध्ये मानवी हक्क आणि लोकशाही मजबूत करण्याच्या उद्देशाने द सेंटर फॉर सिव्हील लिबर्टीज (The Center for Civil Liberties) स्थापना करण्यात आली. युक्रेनच्या नागरी समाजाला बळकट करण्यासाठी आणि युक्रेनला पूर्ण लोकशाही बनवण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याची या संघटनेने महत्त्वाची भूमिका घेतली. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई केली. गेल्या आठ महिन्यापासून रशियाने सातत्याने युक्रेनमधील महत्त्वाची शहरे, नागरी वस्त्या, धरणे, निसर्ग यांची अपरिमित हानी केली आहे. रशियाच्या या अत्याचाराविरुद्ध द सेंटर फॉर सिव्हील लिबर्टीज कायदेशीर आणि अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करत आहे. संघटनेने युक्रेनियन नागरिकांविरुद्ध रशियन युद्ध गुन्ह्यांच्या दस्तऐवजीकरणासाठी निर्भयपणे काम केले आहे.

दरम्यान, 3 ऑक्टोबरपासून नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी (सोमवारी) वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार स्वीडनच्या स्वांते पाबो यांना, तर मंगळवारी अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉझर आणि अँटोन झेलिंगर यांना भौतिक शास्त्रासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला. बुधवारी रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने कॅरोलिन आर. बर्टोझी , मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर केले. तर गुरुवारी (दि. 6) फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नॉक्स यांना 2022 चा साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आला.

मागच्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार (Nobel Peace Prize 2021) दोन पत्रकारांना पुरस्कार मिळाला होता. फिलीपाइन्सनमधील मारिया रेस्सा (Maria Ressa) आणि रशियातील दिमित्री मुरातोव्ह (Dmitry Muratov) या दोन पत्रकारांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Back to top button