वालचंदनगरला रावणाचे दहन | पुढारी

वालचंदनगरला रावणाचे दहन

वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा: वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे 25 फूट उंचीच्या 10 तोंडी रावणाचे दहन करत नागरिकांनी विजयादशमीचे सीमोल्लंघन केले. गेल्या अनेक वर्षांपासून वालचंदनगर येथे विजयादशमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते. येथील वालचंदनगर कंपनी व्यवस्थापन व कामगार पुढाकार घेऊन या उत्सवाचे आयोजन करत असतात. या दिवशी कंपनीमध्ये मशिनरीचे पूजन करण्यात येते. कंपनीने क्लब ग्राउंडवर 25 फूट उंचीची रावणाची प्रतिकृती उभारली होती. सायंकाळी पार पडलेल्या दसरा उत्सवात आकर्षक फटाक्यांची आतषबाजी केली. या आतषबाजीने नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

या कार्यक्रमाप्रसंगी भारत चिल्डन्स अ‍ॅकॅडमी शाळेच्या वतीने रावण दहनाच्या वेळी रामलीलाचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. या कार्यक्रमात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, बिभीषण, सुग्रीव यांच्या वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
दरम्यान कार्यक्रमाच्या शेवटी वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक चिराग दोशी यांनी श्रीरामाच्या धनुष्यातील बाण पेटवून रावण दहन केले. यावेळी तनाज दोशी, फॅक्टरी मॅनेजर धीरज केसकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

Back to top button