नाशिक : सिन्नर नगर परिषद विरुद्ध शिवडे ग्रामपंचायत संघर्ष टाेकाला | पुढारी

नाशिक : सिन्नर नगर परिषद विरुद्ध शिवडे ग्रामपंचायत संघर्ष टाेकाला

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
शिवडे गावातून टाकण्यात आलेली जलवाहिनी विकासकामांत अडथळा ठरत असून, ती मंजूर आराखड्यानुसार स्थलांतरित करावी. खर्च नगरपालिका फंडातून किंवा ठेकेदाराच्या उर्वरित देयकातून करावा, अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी मुख्याधिकारी संजय केदार यांना केल्या.

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि इतर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. शिवडे ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तोडगा न निघाल्यास नगर परिषद विरुद्ध ग्रामपंचात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. मुख्याधिकारी संजय केदार, पाणीपुरवठा अभियंता हेमलता दसरे, माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, मेहमूद दारुवाला, बाळू उगले, अनिल वराडे, पंकज जाधव, प्रशांत सोनवणे, सरपंच हारक, गणेश कर्मे, किरण मुत्रक, बीडीओ मधुकर मुरकुटे आदी उपस्थित होते. शिवडे गावातील जलवहिनी स्थलांतरणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, नपाचे प्रशासक, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचे आमदार कोकाटे म्हणाले. प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांनी याप्रश्नी गांभीर्याने लक्ष घालावे, शहरातील अंतर्गत 35.8 कि.मी. वितरिका आणि इतर कामांसाठी अमृत योजनेच्या प्रस्तावावर तत्काळ स्वाक्षरी करून प्रस्ताव शासन दरबारी पाठवावा तसेच ना हरकत दाखल्यांवर स्वाक्षरीसाठी विलंब करू नये, अशा सूचनाही दिल्या. कडवा पाणी योजनेची स्काडा सिस्टीम कार्यान्वित नसल्याने 7 ऐवजी 52 कर्मचारी काम करत असल्याचे दारुवाला यांनी निदर्शनास आणून दिले. जलवाहिनी नादुरुस्त झाल्यास दुरुस्त करू दिली जाणार नाही. चुकीचे काम करणार्‍या नपाच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करू, असा इशारा शिवडे ग्रामस्थांनी दिला.

मुख्याधिकार्‍यांसोबत शाब्दिक चकमक
विकासकामांसाठी मुख्याधिकार्‍यांकडून चार-चार महिने ना हरकत मिळत नाही, असा आरोप माजी नगरसेविका शीतल कानडी, सुनील कानडी यांनी केला. तर माहिती अधिकारात माहिती मिळत नसल्याची तक्रार पंकज जाधव यांनी केली. मात्र, मुख्याधिकार्‍यांनी आरोप फेटाळले. त्यानंतर कानडी, जाधव आक्रमक झाले व शाब्दिक चकमक उडाली.

हेही वाचा:

Back to top button