नाशिक शहरात अनधिकृत बॅनर्सचा सुळसुळाट, इच्छुकांची चमकोगिरी

नाशिक शहरात अनधिकृत बॅनर्सचा सुळसुळाट, इच्छुकांची चमकोगिरी
Published on
Updated on

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांकडून वाढदिवस, सण, उत्सवांची संधी साधून होर्डिंगबाजी सुरू आहे. चौकाचौकांत, सिग्नल्सवर, वाहतूक बेटांमध्ये, रस्त्यांवर, विद्युत पोलवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनरबाजीला उधाण आले आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशाकडे मनपासह खुद्द पोलिस प्रशासनाचेही पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने शहर विद्रुपीकरणात भर पडत आहे.

शहरात अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्समुळे होणारे विद्रुपीकरण व त्यातून उद्भवणारे वाद लक्षात घेता गेल्या वर्षी दि. 17 सप्टेंबर रोजी तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोस्टर्स, बॅनर्स, फलक प्रतिबंधाबाबत अधिसूचना तयार केली होती. त्याची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करून संपूर्ण शहरात कोणालाही बॅनर, पोस्टर लावायचे असल्यास त्यास मनपाच्या अधिकृत जागेवरच मनपासह पोलिस प्रशासनाची परवानगी घेऊनच बॅनर्स लावण्यास परवानगी देण्यात येत होती. तसेच त्याबाबत शहरातील सर्व बॅनर्स प्रिंटिंग चालकांनादेखील परवानगीशिवाय प्रिंटिंग करू नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

जोपर्यंत पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय रुजू होते तोपर्यंत संपूर्ण शहरात कुठेही अनधिकृत बॅनर व पोस्टर लागत नव्हते. विद्यमान पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनीदेखील सदरची अधिसूचना पुढे तशीच कायम ठेवली होती. मात्र, त्याबाबत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

संपूर्ण पंचवटी परिसरात इच्छुकांकडून बॅनरबाजीला ऊत आला आहे. अनधिकृत बॅनर्समुळे होणारे विद्रुपीकरण लक्षात घेता त्या अधिसूचनेची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. मात्र, प्रशासन नक्की आणखी किती दिवस गप्प बसणार की त्यावरून एखादा मोठा वाद होण्याची वाट पाहणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पोलिसांच्या कारवाईची प्रतीक्षा
काही महिन्यांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षाच्या वाढदिवसानिमित्त पंचवटी परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले होते. त्याची तातडीने दखल घेत जुना आडगाव नाका पोलिस चौकीच्या एका अधिकार्‍याने त्यांच्या कार्यकर्त्यांना रातोरात उचलून संपूर्ण परिसरातील बॅनर पहाटेपर्यंत हटवायला लावले होते. मात्र, अशाच प्रकारची तत्परता त्या प्रकरणानंतर संबंधित अधिकार्‍याकडून पुन्हा पाहायला मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांना पोलिसांच्या धडक कारवाईची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news