लासलगाव : (जि.नाशिक) पुढारी वृत्तसेवा
प्रभू श्रीराम, सम्राट चंद्रगुप्त, कृष्णदेवराय, छत्रपती शिवाजी महाराज आदी पराक्रमी महापुरुष तसेच राष्ट्रजीवनाच्या दर्शनशास्त्रे, कला, विज्ञान इत्यादी विविध क्षेत्रात महान व्यक्तींनी केलेले कार्य हे विजयपर्व आहे. स्वतंत्र भारतात सोमनाथ मंदिरचा जीर्णोद्धार, अयोध्येतील प्रभू श्रीरामजन्मभूमीवर भूमीपूजन हे सर्व विजयपर्व असून विजयादशमीच्या निमित्ताने या सर्वांचे स्मरण औचित्याचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी केले.
रा. स्व. संघाच्या लासलगाव येथील शस्त्रपूजन उत्सवात ते प्रमुख वक्ते होते. समूहधर्माची उपासना केली तेव्हाच हे राष्ट्र विजयी होत राहिले. समाजसंघटन हीच आजची शक्ती आहे. महात्मा गांधींचा "शेवटच्या माणसाचा विचार करणे" व पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या "अंत्योदय" संकल्पना बहुजनांचा विकास स्पष्ट करतात. संघ शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत असून आगामी काळात वंचितांसाठी कुटुंबव्यवस्था दृढीकरणासाठी कुटुंबप्रबोधन, पर्यावरण रक्षण, सामाजिक समरसता, ग्रामविकास इत्यादी क्षेत्रात समाजाच्या सहभागाने परिवर्तन घडविण्याचे उद्दीष्ट असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय गवळी त्यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास नाशिक जिल्हा कार्यवाह अरूण मोरे, हभप प्रशांत महाराज रायते तसेच स्वयंसेवक संख्येने उपस्थित होते.