आता पदाची अपेक्षा नको, २०२४ च्या तयारीला लागा; भगवान भक्तीगडावरुन पंकजा मुंडेंचे आवाहन

आता पदाची अपेक्षा नको, २०२४ च्या तयारीला लागा; भगवान भक्तीगडावरुन पंकजा मुंडेंचे आवाहन
Published on
Updated on

बीड, पुढारी वृत्तसेवा : माझी खरी ताकद तुम्ही आहात, म्हणून आज तुमच्यासमोर नतमस्तक होत आहे. आपला मेळावा हा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडविणाऱ्यांचा आहे. तुमच्या ताकदीवरच आजवरची वाटचाल केली आहे. यापुढे पदाची अपेक्षा नको, आता आपण आपली ताकद २०२४ च्या निवडणूकीत दाखवू, असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यातून दिला.

पाटोदा तालुक्यातील राष्ट्रसंत भगवानबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव येथे बुधवारी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास खा. सुजय विखे, महादेव जानकर, खा. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे, राधाताई सानप महाराज, आमदार सुरेश धस, आ. मेघना बोर्डीकर, नमिता मुंदडा, आ. मोनीका राजळे, गोविंद केंद्रे, शिवाजीराव कर्डीले, अक्षय मुंदडा, भीमराव धोंडे, केशवराव आंधळे, रमेश आडसकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, विजय गोल्हार, मुरकुटे, सदाशिव खाडे, मोहनराव जगताप, देविदास राठोड, डॉ. सुनिल कायंदे आदिंची उपस्थिती होती. प्रारंभी महादेव जानकर, राधाताई महाराज सानप, शिवाजीराव कर्डीले, खा. सुजय विखे, खा. प्रितम मुंडे यांनी मार्गदर्शन केले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून आजवरच्या घडामोडींचा आढावा घेत भविष्यातील वाटचालीचेही संकेत दिले. मुंडे म्हणाल्या, माझ्या कार्यकर्त्यांना वाटते मला एखादे पद मिळावे, त्यात गैर काय, त्यांना अपेक्षा असणे काही चुकीचे नाही. पण मी मात्र पदासाठी कोणापुढे पदर पसरणार नाही. माझा जन्म स्वाभीमानी कुटुंबात झाला, मरण येईपर्यंत तो कायम ठेवण्याची शक्ती मला भगवानबाबांनी द्यावी. संघर्ष करणे हे आमच्या रक्तातच आहे. ज्यांनी माझ्यावर टीका केली, त्यांच्यावर देखील मी कधी आरोप केले नाही. कधी कोणी चुकले तर त्या संधीचा फायदा मी उचलला नाही. चर्चा पसरत असतात. हकीकत को तलाश करना पडता है, अफवाये तो घर बैठे बैठे मिल जाती है… हे सत्य आहे. माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला खुर्च्या नाहीत. खुर्च्या दिल्या असत्या तर हा मेळावा आणखी चौपट मोठा झाला असता.

संघर्ष सर्वांनाच करावा लागला, संघर्षाशिवाय नाव होत नाही. कोणाचे जोडे उचलणार्‍याचे नाव इतिहासात कधीच होत नाही. संघर्ष मी नाकारणार नाही, नाकारु शकत नाही.

माना के औरो के मुकाबले कुछ पाया नही हमने, पर खुद को गिरा के कुछ पाया नही हमने. माझी तुम्हाला विनंती आहे. आता मी 2024 ला परळी मतदारसंघात पक्षाने तिकीट दिले तर त्याच्या तयारीला लागा. जरुरत से जादा इमानदार हु मै, इसलिए सब के नजरो मे गुनेहगार हु मै. ज्योतीतून यज्ञ आणि थेंबातून समुद्र कसा बनतो हे दाखवून देवू. झोकून द्या आणि कष्ट करुन उभा करु आपले स्वाभिमानाचे राज्य. मी कोणासमोर मागायला जाणार नाही, शेवटी 'जितना बदल सकते थे हम, उतना बदला है खुद को, अब जिनको हमसे शिकायत है, वो खुद बदले' असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

या मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच परराज्यातून आलेले संत भगवानबाबा यांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news