नाशिक : 20 हजार शिवसैनिकांचे ‘चलो शिवाजी पार्क’ | पुढारी

नाशिक : 20 हजार शिवसैनिकांचे ‘चलो शिवाजी पार्क’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेतर्फे मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यासाठी नाशिक शहर व जिल्ह्यातून 20 हजार शिवसैनिक नेण्याचा निर्धार पदाधिकार्‍यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला, अशी माहिती उपनेते व माजी मंत्री बबन घोलप यांनी दिली.
मुंबईमध्ये होणार्‍या दसरा मेळाव्याबाबत नियोजन करण्यासाठी शिवसेनेतर्फे शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते

व्यासपीठावर उपनेते सुनील बागूल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, कुणाल दराडे, उपजिल्हाप्रमुख निवृती जाधव, जगन आगळे, माजी आ. योगेश घोलप, दीपक दातीर, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार, सचिन मराठे, महेश बडवे, आजिम सय्यद, शोभा मगर, शोभा गटकळ, भारती जाधव, समन्वयक मंदा दातीर, श्यामला दीक्षित आदी उपस्थित होते. शिवसेनेचा मेळावा ऐतिहासिक ठरणार असल्याचे उपनेते सुनील बागूल यांनी सांगितले. शिवसैनिक विशाल गर्दीने गद्दारांना त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वास सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला. विलास शिंदे यांनी प्रास्ताविक, तर सुभाष गायधनी यांनी सूत्रसंचालन केले.

मेळाव्यासाठी एकेक कोटी वाटल्याचा आरोप
शिंदे गटाने नाशिकमध्ये दिलेले पदाधिकारी म्हणजे चिल्लर कंपनी आहे. जिल्हाध्यक्षपदावर नियुक्त झालेल्या पदाधिकार्‍याला त्याच्या गावातील साधी ग्रामपंचायत जिंकता आली नाही. तो जिल्हा काय सांभाळणार, अशा शब्दांत बागूल यांनी तांबडेंवर सडकून टीका केली. मेळाव्याला लोक यावेत, यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी त्यांच्यातर्फे एकेक कोटी रुपये वाटल्याची चर्चा असून, यावरूनच त्यांची राज्यात काय दयनीय अवस्था झाली आहे, याची प्रचिती येते, असे संपर्कप्रमुख जयंत दिंडे म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button