पिंपरी : कर्तव्यासोबत आरोग्याचीही ‘ड्यूटी’; कोरोनामुळे 5, तर इतर आजारांनी 7 पोलिसांचा मृत्यू | पुढारी

पिंपरी : कर्तव्यासोबत आरोग्याचीही ‘ड्यूटी’; कोरोनामुळे 5, तर इतर आजारांनी 7 पोलिसांचा मृत्यू

संतोष शिंदे
पिंपरी : पिंपरी पोलिस ठाणे येथे नियुक्तीस असलेल्या एका फौजदाराचा नुकताच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत ‘पुढारी’ने पिंपरी चिंचवडमध्ये मृत पावलेल्या पोलिसांची माहिती घेतली असता आत्तापर्यंत बारा पोलिसांचे अकाली निधन झाल्याचे सांगण्यात आले. यातील पाच कोरोनामुळे, एक अपघात आणि इतर सहाजण आजारांना बळी पडले आहेत. त्यामुळे पोलिसांना कोरोनापेक्षा इतर आजार जास्त बाधल्याचे बोलले जात आहे.

नंदकिशोर पतंगे (31, रा इंद्रायणीनगर, भोसरी) असे मृत्यू झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. पतंगे हे पिंपरी पोलिस ठाण्यात नियुक्त होते. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले होते. एका अर्जप्रकरणात हलगर्जी केल्याचा ठपका ठेऊन त्यांच्यावर ही तात्पुरती कारवाई करण्यात आली होती. नियंत्रण कक्षाला संलग्न केल्यापासून पतंगे तणावात असल्याचे त्यांचे सहकारी सांगतात. पतंगे यांचा मृत्युमुळे पोलिस दलातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले. त्यांच्या मृत्यूनंतर उलटसुलट चर्चांना उधाण आले; मात्र शिस्तीचे खाते अशी पोलिस खात्याची ओळख आहे. त्यामुळे शिस्तीला तडा जाऊ नये, यासाठी अशा प्रकारची कारवाईदेखील तितकेच गरजेचे असल्याचे जाणकार सांगतात.

हतबल होऊ नये
तडकाफडकी बदली किंवा एखादी शिस्तभंगाची कारवाई झाल्यानंतर पोलिसांनी हतबल होऊ नये; तसेच सर्वप्रथम स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोनाशिवाय मृत पावलेल्या पोलिसांमध्ये अपघात वगळता सहा पोलिसांमध्ये आरोग्याबाबत हलगर्जीपणा असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी कर्तव्यासोबतच आरोग्याबाबतही सतर्क राहणे अवश्यक आहे.

पोस्टिंगसाठी स्पर्धा
पिंपरी- चिंचवड आयुक्तालयातील पंधरा पोलिस ठाणी आणि तीन चौक्या अशा अठरा ठिकाणी पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येते. याव्यतिरिक्त गुन्हे शाखेची पाच युनिट, अंमली पदार्थ, शस्त्र विरोधी, खंडणी, दरोडा, गुंडाविरोधी आणि आर्थिक गुन्हे शाखा येथील पोस्टिंग महत्त्वाची मानली जाते. तसेच, वाहतूक शाखेच्या तेरा विभाग मिळवण्यासाठीदेखील चढाओढ असते. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयात एकूण 66 पोलिस निरीक्षक हजर आहेत. यांच्यात पोस्टिंगसाठी छुपी स्पर्धा असल्याचे पहावयास मिळते.

आहाराच्या वेळा अनिश्चित
काही वेळेला अचानक बंदोबस्त किंवा पोलिस ठाण्यात गोंधळ होतो. त्या वेळी ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकार्‍यांना जास्त वेळ थांबावे लागते. यामध्ये जेवणाची वेळ टळून जाते. अनेकदा पोलिस हॉटेलमधून पार्सल मागवून खातात. संतुलित आहाराकडे होणार्‍या दुर्लक्षामुळे देखील पोलिसांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ लागला आहे.

प्रेमलोक पार्कचा धसका
पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारीदेखील नेहमी तणावात असल्याचे पाहावयास मिळते. याला महत्त्वाचे कारण म्हणजे, शहरातील उच्चपदस्थांची नागरिकांसाठी असलेली ओपन डोअर पॉलिसी. पोलिस ठाण्यात समाधान न झाल्यास नागरिक थेट प्रेमलोक पार्क येथील आयुक्त कार्यालयात येऊन धडकतात. येथील वरिष्ठ अधिकारी संबंधित प्रकरण ऐकून प्रभारी अधिकार्‍यांना धारेवर धरतात. नुकतेच अवैध धंद्यांच्या तक्रारीवरून दोन वरिष्ठ निरीक्षकांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले होते. त्यानंतर चौकशी करून पुन्हा त्यांना मूळ ठिकाणी पाठवण्यात आले. त्यामुळे प्रभारी अधिकार्‍यांना प्रेमलोक पार्कचा चांगलाच धसका घेतल्याचे
दिसून येत आहे.

आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको
पोलिसांनी स्वतःसह कुटुंबीयांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आरोग्याबाबत तक्रारी जाणवत असल्यास सर्वप्रथम उपचार घेणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे पुढील धोके टाळता येतील. तसेच, दररोज सकाळी व्यायाम, योगा केल्यास शरीरासोबत मानसिक आरोग्यदेखील सुदृढ राहण्यास मदत होईल.

                                                                    – अंकुश शिंदे,
                                                     पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड

 

Back to top button