व्हीआयपी म्हणजे, घरचं झालं थोडं..! गुन्हे शाखेच्या पोलिसांवरही बंदोबस्ताचे ओझे | पुढारी

व्हीआयपी म्हणजे, घरचं झालं थोडं..! गुन्हे शाखेच्या पोलिसांवरही बंदोबस्ताचे ओझे

संतोष शिंदे : 

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित सुमारे 60 ते 70 लाख इतकी मोठी लोकसंख्या येते. आयुक्तालयाची हद्द 500 चौरस किलोमीटर इतकी आहे. मात्र, आयुक्तालयात सध्या केवळ साडेतीन हजार पोलिस उपलब्ध आहेत. रात्र आणि दिवस पाळी, साप्ताहिक सुट्या, किरकोळ रजा, आजारपण, कार्यालयीन कामकाज करणारे पोलिस वगळता प्रत्यक्ष काम करण्यासाठी मोजकेच पोलिस उरतात. यातच सध्याची राजकीय परिस्थिती पाहता व्हीआयपींना (अति महत्त्वाच्या व्यक्ती) स्थनिक पोलिसांसह गुन्हे शाखेचा देखील बंदोबस्त द्यावा लागत आहे. त्यामुळे व्हीआयपी दौरा म्हणजे, घरचं झालं थोडं अन् व्याह्याने धाडल घोडं, अशीच काहीशी परिस्थिती पिंपरी-चिंचवड पोलिसांची होत आहे.

प्रभारी अधिकार्‍यांची कसरत
शहर परिसरात नेहमीच अति महत्त्वाच्या व्यक्तींची रेलचेल असते. व्हीआयपी येणार म्हटले की, सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त लावला जातो. यामध्ये दिवसभर पोलिसांचा मोठा फौजफाटा अडकून पडतो. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर काम करताना प्रभारी अधिकार्‍यांना मोठी कसरत करावी लागते.

अतिरिक्त सुरक्षा पथक
व्हीआयपी बंदोबस्तासाठी गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचार्‍यांना राज्याच्या विशेष सुरक्षा पथकाप्रमाणे सफारी पोशाख देण्यात आला आहे. व्हीआयपींना केंद्राची, राज्याची सुरक्षा असली तरीही सध्याची राजकीय परिस्थिती पाहता गुन्हे शाखेचे अतिरिक्त सुरक्षा पथक तयार करण्यात आले आहे. यातील कर्मचार्‍यांना वेगवेगळी जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.

व्हीआयपी मार्गावरही अतिरिक्त कडे
आयुक्तालयाच्या हद्दीतून व्हीआयपी जाणार असल्यास गुन्हे शाखेचे सफारी घातलेले पोलिस मार्गाची पाहणी करतात. तसेच, व्हीआयपी अनपेक्षितपणे कोठेही थांबल्यास त्यांच्या सुरक्षेसाठी संबधित कर्मचारी गोलाकार कडे करून थांबतात. सफारी पोशाख घातलेल्या कर्मचार्‍यांशिवाय साध्या वेशातही काही पोलिस नेमून देण्यात आले आहेत.

ऑर्डर पडली.. पळा
सन 2018 मध्ये पुणे शहर पोलिस आणि ग्रामीण पोलिसांचा भाग तोडून पिंपरी- चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. मात्र, तीन वर्षानंतरही पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या मनुष्यबळाची समस्या सुटली नाही. ज्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांना हातातील काम सोडून व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी पळावे लागत आहे.

कामावर परिणाम
गुन्हे शाखेचे पोलिस हद्दीत फिरून गोपनीय माहिती काढत असतात. एखादा धागा सापडल्यानंतर त्या आधारे गुन्ह्याची उकल करण्यासाठी दिवस रात्र काम सुरु असते. यातच अचानक बंदोबस्त ऑर्डर पडल्यानंतर हातातील काम अर्धवट सोडून त्यांना पळावे लागत आहे. त्यामुळे कित्येकदा तपासाची लिंक तुटल्याचे पोलिस कर्मचारी नाव न छापण्याच्या अटीवर सांगतात. एकंदरीतच व्हीआयपींच्या बंदोबस्तात गुन्हे शाखेतील पोलिसांना घेतल्याने त्यांच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.

गुन्हे शाखेवरील ताण वाढला
रोजगाराच्या शोधात देशभरातून आलेले लोंढे शहरात स्थायिक होऊ पाहत आहेत. महापालिकेच्या नोंदीनुसार शहराची लोकसंख्या केवळ साडेबावीस लाख इतकी आहे. प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक लोक शहरात वास्तव्यास आहेत. ज्यामुळे गुन्हेगारीतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. परप्रांतीयांनी शहरात गुन्हे केल्यानंतर त्यांच्या मूळगावी जाऊन शोध घेताना पोलिसांची मोठी दमछाक होत आहे. यातच व्हीआयपींच्या बंदोबस्तामुळे गुन्हे शाखेवरील ताण वाढला आहे.

शहरात येणार्‍या किंवा शहर परिसरातून जाणार्‍या व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी गुन्हे शाखेतील काही कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत. दरम्यान, तीस जणांना सफारी पोशाख देण्यात आला आहे. व्हीआयपींच्या सभोवतालच्या गर्दीवर वॉच ठेवून काही अनुचित प्रकार घडणार नाही, याची जबाबदारी संबंधित कर्मचार्‍यांवर सोपवली आहे.
                     6- डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उपायुक्त, पिंपरी- चिंचवड

Back to top button