Nashik Crime : व्यावसायिक स्पर्धेतूनच उद्याेजकाचा खून, पोलिस आयुक्तांची माहिती | पुढारी

Nashik Crime : व्यावसायिक स्पर्धेतूनच उद्याेजकाचा खून, पोलिस आयुक्तांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड येथील फर्निचर कारखान्याचे संचालक शिरीष गुलाबराव सोनवणे (५६) यांच्या खून प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये सोमनाथ रामचंद्र कोंडाळकर (३६, रा. कालिकामाता मंदिरामागे) आणि प्रवीण आनंदा पाटील (२८, घुगे मळा) यांच्यासह एका कारचालकाचा समावेश आहे. प्राथमिक चौकशीत संशयितांनी व्यावसायिक स्पर्धेतून उद्योजक सोनवणे यांचा खून करण्यात आल्याचे समोर आल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली.

उद्योजक सोनवणे खुनाचा तब्बल २३ दिवसांनी छडा लागला असून, त्याबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी (दि. ३०) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपआयुक्त विजय खरात, गुन्हे उपआयुक्त संजय बारकुंड, सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, निरीक्षक गणेश न्याहाळदे उपस्थित होते. उद्योजक सोनवणे यांच्या खुनामुळे संपूर्ण शहर हादरले होते. या खुनाच्या तपासासाठी नाशिकरोड पोलिसांनी पाच पथके तैनात करून तपासाची चक्रे फिरविली. तसेच सोशल मीडियावर संशयितांचे फोटो व्हायरल केल्याचा फायदा झाल्याचे पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी सांगितले.

संशयित कोंडाळकर आणि पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी अंबडमध्ये वेल्डिंगसह बेंच तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. काही दिवसांतच तो ठप्प झाल्याने त्यांनी उद्योजक सोनवणे यांची भेट घेऊन ऑर्डर देण्याची मागणी केली होती. मात्र, सोनवणे यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. व्यवसायावर परिणाम झाल्याने कोंडाळकर व पाटील काही महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत होेते. राहत्या घरासह वर्कशॉपचे भाडे देणेही दोघांना मुश्किल झाले होते. सोनवणेंकडून ग्राहक मिळत नसून, स्पर्धा वाढत असल्याने त्यांच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिस आयुक्त नाईकनवरेेेेे यांनी स्पष्ट केले.

उद्योजक सोनवणे यांच्या हत्येनंतर उद्योग क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हत्येची उकल झाल्याने व्यावसायिकांमधील भीती दूर होण्यास मदत होईल. खंडणी तसेच धमक्यांसंदर्भात व्यावसायिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. जेणेकरून वेळीच कार्यवाही करणे शक्य होईल.

– जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त

हेही वाचा :

Back to top button