खेड कृषी उत्पन्न बाजार समितीस 1 कोटी 94 लाखांचा नफा | पुढारी

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीस 1 कोटी 94 लाखांचा नफा

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची 18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 30) समितीचे प्रशासकीय अधिकारी हर्षित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बाजार समितीला मागील आर्थिक वर्षात 1 कोटी 94 लाख 38 हजार रुपये निव्वळ नफा झाला आहे. आगामी काळात आळंदी येथे उपबाजार सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

खेड बाजार समितीची सभा समितीच्या राजगुरुनगर येथील सभागृहात पार पडली. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, माजी सभापती अशोक राक्षे, चंद्रकांत इंगवले, विलास कातोरे, सयाजी मोहिते, धैर्यशील पानसरे, शांताराम भोसले, कैलास लिंभोरे, वंदना सातपुते यांच्यासह ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी, हमाल-अडते यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी वर्षभरातील विकासकामांचा आढावा घेत अहवाल आणि आर्थिक ताळेबंद यांचे वाचन केले. या सभेत माजी सभापती संचालक रमेश राळे, बाबाजी काळे, शांताराम भोसले आदींनी प्रश्न उपस्थित केले. प्रशासक हरिश्चंद्र कांबळे यांनी समर्पक उत्तरे दिली.

शेतकर्‍यांचे विविध प्रश्न, आळंदी येथे उपबाजार बाजार सुरू करावा, तरकारी शेड बांधावे, बाजारात आलेल्या शेतकर्‍यांना पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, जेवणाची चांगली व्यवस्था, बाजारगाळ्यांमध्ये पोटभाडेकरू, बाजार समित्यांमध्ये असलेल्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रशासक हरिश्चंद्र कांबळे म्हणाले की, आळंदी येथे नव्याने उपबाजार सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला आहे. याबाबत पाठपुरावा सुरू आहे. मापाडी, व्यापारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

 

Back to top button