जळगाव : तानाजी सावंत यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी | पुढारी

जळगाव : तानाजी सावंत यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथे मराठा समाजाबद्दल बेजबाबदार विधान केल्याने राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्या निषेधार्थ मंगळवारी (दि. २७) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन छेडण्यात आले. मंत्री सावंत यांना मंत्रिपदावरून दूर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महानगरने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना मराठा समाजाच्या विरोधात बेजबाबदार विधान केले. त्यानंतर सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ठिकठिकाणी आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांचा राजीनामा घेऊन, त्यांनी समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजीही केली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, सहकार सेलचे वाल्मीक पाटील, युवक महानगराध्यक्ष रिकू चौधरी, रमेश बाऱ्हे, शालिनी सोनवणे, जयश्री पाटील, इब्राहिम तडवी, प्रवक्ते योगेश देसले, अमोल कोल्हे आणि इतर उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button