नाशिक : मनमाडला माजी नगराध्यक्षांचे स्मशानभूमीत आंदोलन | पुढारी

नाशिक : मनमाडला माजी नगराध्यक्षांचे स्मशानभूमीत आंदोलन

नाशिक, मनमाड : पुढारी वृत्तसेवा
रेल्वे सुरक्षा बलाच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या फिर्यादीची शहर पोलिसांनी शहानिशा न करता दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी शिवसेनेचे नांदगाव तालुका संपर्कप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक यांनी कार्यकर्त्यांसमवेत थेट स्मशानभूमीत आंदोलन करत निषेध व्यक्त केला. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी नाईक यांनी केली.

स्मशानभूमीत आंदोलनाप्रसंगी नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रेल्वेमार्गाला लागूनच माझी शेती आणि मळा असल्यामुळे मी नेहमीच शेतीकामासाठी उपस्थित असतो. अनेकदा रेल्वेतून पडून जखमी झालेल्यांना आपण मदत केली आहे. काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती रेल्वेतून पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. मी रेल्वे सुरक्षा बल आणि पोलिसांना याची माहिती देऊन घरी निघून गेलो. मात्र, दुसर्‍या दिवशी आरपीएफने आपल्याविरोधात शहर पोलिस स्थानकात दमदाटी, धक्काबुक्कीची तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आपल्याविरोधात भादंवि 353 अन्वये गुन्हा दाखल केला. आपण कोणालाही दमदाटी केली नसताना खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी आपण आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. जर संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी नाही झाली तर आगामी काळात आपण बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा नाईक यांनी दिला.

यावेळी माजी आमदार जगन्नाथ धात्रक, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, शहरप्रमुख माधव शेलार, माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे यांच्यासह लियाकत शेख, विनय आहेर, अनिल दराडे, संजय कटारिया, हरीश असार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button