नाशिक : चालत्या ट्रॅक्टरचा बिबट्याने केला पाठलाग | पुढारी

नाशिक : चालत्या ट्रॅक्टरचा बिबट्याने केला पाठलाग

नाशिक (शिंदवड) : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे बिबट्यांचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. द्राक्ष बागांच्या ऑक्टोंबर छाटणीला नुकतीच सुरुवात झाली असुन बागांना फवारणी रात्रीच्या वेळी देखील काही किटकांसाठी करावी लागते. यावेळी बागेत ट्रॅक्टर मल्चिंग करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागे बिबटे येतांना दिसले. बिबटे परिसरात राहत असल्याने भितीपोटी शेतकरी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडत नसुन बागांना फवारणी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा झाला आहे.

शनिवार (दि.24) ज्ञानेश्वर विश्वनाथ बस्ते यांच्या मळ्यात सायं 6 च्या दरम्यान बागेत मल्चिंग करणारा ट्रॅक्टर सुरु होता. यावेळी परिसरातील सर्व शेतकरी आपआपल्या शेतात कामात व्यस्त होते. यावेळी दोन बिबटे अचानक मल्चिंग करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागे जोराने येताना ट्रॅक्टरचालकाने बघितले असता त्याने वेगाने ट्रॅक्टर पळवला. हॉर्न देवुन इतर शेतकऱ्यांना देखील सतर्क केले. बिबटे माघारी फिरले परंतु या प्रकाराने ट्रॅक्टरचालक पुन्हा काम करण्यास तयार नव्हता. यावेळी बाजुचे सर्व शेतकरी जमा हाेऊन त्यांनी राहिलेले मल्चिंगचे काम पूर्ण केले. थोड्यावेळाने पुन्हा बिबटे बॅटरीच्या प्रकाशात दिसून आले. मागील तीन ते चार दिवसापूर्वी देखील सचिन कचरु बस्ते हे आपल्या वाहनातून घरी जात होते. यावेळी रात्री आकराच्या सुमारास बिबट्या दोन कुत्र्यांचा पाठलाग करतांना त्यांनी बघितला होता. तसेच महिनाभरापूर्वी देखील बिबट्याने नामदेव पुंडलिक मोरे यांच्या वासरावर हल्ला करुन ठार करुन शेजारच्या डोंगरात ओढुन नेले. बिबट्यांनी अनेक पाळीव कुत्रे देखील फस्त केले आहे. बिबट्यांच्या भितीने रात्रीच्या वेळी लाईट असते तेव्हा टोमॅटो आदी पिकांना पाणी व ठिबकने खते द्यायची असतात. बिबट्यांचा वावरामुळे परिसरातील शेतीकामांना ब्रेक लागला आहे. वनविभागाने पिंजरा लावला असता  बिबट्या पिंजऱ्यात येत नसुन दोन बिबटे व दोन पिल्ले देखील येथील भागात आढळुन आले आहेत. त्यामुळे वनविभागाने पिंजरे वाढवून सर्च ऑपरेशन राबवण्याची मागणी शिंदवड ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे. येथील भितीदायक प्रकाराची माहिती खासदार भारती पवार व दिंडोरीचे प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर यांना दुरध्वनीवरुन देण्यात आली आहे. वणीचे वनपरिमंडळ अधिकारी आर व्ही तुंगार यांनी सांगितले की, पिंजरे वाढवुन सर्च ऑपरेशन देखील करण्याचा प्रयत्न करु. नागरिकांनी सतर्क राहुन पाळीव जनावरे बंदीस्त गोठ्यात ठेवावे असे आवाहन वनविभाकडुन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button