पुरंदरच्या अतिवृष्टी नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी | पुढारी

पुरंदरच्या अतिवृष्टी नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी

निरा; पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी गुळुंचे (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी कांचन निगडे यांनी केली आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पत्र पाठविले आहे. पंचनाम्याबाबत महसूल व कृषी विभाग उदासीन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महिना झाला तरी पंचनामे बाकी आहेत. वास्तविक, सरसकट नुकसानभरपाई फॉर्म भरून घेणे आवश्यक असताना तोंडदेखले पंचनामे दिशाभूल करणारे वाटतात.

त्यात महसूल व कृषी विभागाच्या पातळीवरील निरुत्साही भावना शेतकर्‍यांना अडचणीची वाढविणारी ठरत आहे. त्यांचे कर्मचारी कधी रजेवर, कधी दुसर्‍या कामात अडकल्यावर पंचनामा होईपर्यंत लोकांनी शेत मशागत करायचे थांबायचे का ? अजून नवरात्रीमध्ये पडणारा पाऊस बाकी आहे, त्याचे नव्याने नुकसान वेगळेच होणार असताना आता काही क्षेत्रातून ओढ्यासारखे पाणी वाहून गेले. आज पाणी आटून गेले, मग वास्तव पाहणीत पाणी नाही, लहान ऊस हिरवा दिसतो.

ते क्षेत्र टाळणे योग्य आहे का? त्या उसाला ऊन पडले की करपा, मूळ कुज होणार आहे. फुटवे कुजून गेले, ऊस एकशिवडी गेला हे नुकसान ए.सी.मध्ये  बसून काम करणार्‍या अधिकार्‍यांना कसे कळणार ? अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरसकट तातडीने पंचनामे करावेत. त्वरित नुकसानभरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करावी. शेतकर्‍यांची छोटी – मोठी पिके पूर्णतः नष्ट झालीत. त्यांची सरसकट पीक कर्जमाफी करावी, अशी मागणीही निगडे यांनी अजित पवार यांंना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

Back to top button